नवी मुंबई (योगेश महाजन) :- गत महिन्यात विरारमध्ये इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून याच इमारतीला पालिकेने नोटीसही दिली होती.मात्र वेळीच काळजी न घेण्यात आल्याने अखेर १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काही जण जखमीही झाले आहेत.सदरील दुर्घटना अतिशय गंभीर असून याच धर्तीवर भविष्यात नवी मुंबईत शहरात एखादी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग निवडक काही जणांवरच कारवाया करत असून तक्रार प्राप्त इमारतींना अभय देत असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.स्वतःच्या स्वार्थासाठी सिडको व न.मु.म.पा चा अतिक्रमण विभाग सामान्य नागरिकांचा बळी देण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवी मुंबई सिडको व न.मु.म.पा हद्दीत किती अनधिकृत बांधकामे सुरु आहेत,किती जणांवर कारवाई झाली,कारवाई झालेल्या इमारतींची स्थिती सध्या काय आहे याची नगरविकास विभागाकडून माहिती घेण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून होत आहे,तर सिडको व न.मु.म.पा च्या अतिक्रमण विभागातील अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी अशीही मागणी होत आहे.
पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व भागातील रमाबाई अपार्टमेंट ही रहिवासी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. 7 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ही दुर्घटना मंगळवारी (26 ऑगस्ट) रात्री 11.30 च्या दरम्यान घडली.माहितीनुसार, ही इमारत 15 वर्षं जुनी होती आणि पालिकेने इमारतीला नोटीसही दिली होती. या दुर्घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या इमारतीत 25 ते 30 कुटुंब राहत होते.विधानसभेत अनधिकृत बांधकामांचा मुद्दा चर्चेला आला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावर बोलतांना सांगितले कि शासन कोणत्याही अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. जर अधिकारी अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचे आढळले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात येईल.नवी मुंबई मनपा व सिडको हद्दीत आजमितीस शेकडो अनधिकृत बांधकामे सुरु असून त्या अनधिकृत बांधकामांना नवी मुंबई मनपाचे व सिडको अतिक्रमण विभागाचे अधिकारी पाठीशी घालत असल्याचे दिसून आले आहे.तक्रारी असूनही अधीकारी कारवाई करत नसल्याचे उघडकीस आले असून उलट तक्रारीच्या नावाखाली प्रति इमारत १५ ते २० लाख रुपये अधिकारी घेत असून भूमाफियांनी अभय देत असल्याची चर्चा आहे.अश्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.अनधिकृत इमारतींमुळे आजतायागत शेकडो नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून अजून अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.याला सर्वस्वी अधिकारीच जबाबदार असला तरी त्यांना शिक्षा होत नसल्याने आजही तेच प्रकार सुरु आहेत.सिडको हद्दीत हजारो अनधिकृत बांधकामे असून मार्च २०२५ पर्यंतची यादीच सिडकोने जाहीर केली आहे.सिडको कडून फक्त अतिक्रमण संदर्भात कागदी घोडे नाचवले जात असून त्याच धर्तीवर अधिकारी आपली आर्थिक पोळी भाजून घेण्याचे काम करतांना दिसून येत आहेत.थातुर मातुर कारवाया करून बलाढ्य भूमाफियांना अभय देण्याचे काम सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून केले जात असल्याने आजही बहुतांश ठिकाणी अनधिकृत कामे जोमाने सुरु आहेत.बेलापूर गावातील फ़णसपाडा गावदेवी मंदिराच्या बाजूलाच जी + २ दोन अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु आहे.न.मु.म.पा शहाबाज अंगणवाडी च्या माघे दोन अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु असून जुना वार्ड ऑफिस शौचालयाच्या माघील बाजुसही अनधिकृत इमारतींचे बांधकाम सुरु आहे.नेरुळ मध्येही बालाजी मंदिराच्या माघील बाजूस ज्या अनधिकृत बांधकामांवर एक पेक्षा जास्त वेळा कारवाई झाली आहे.त्या ठिकाणी पुन्हा बांधकामे सुरु आहे.तुर्भे विभाग कार्यालयाच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरु असून येथील कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे अतिक्रमणाला अभय देत असल्याचे दिसून येत आहे.सिडकोचे अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणे यांच्यावर परिणामकारक नियंत्रण ठेवण्यासाठी सहाय्यक वसाहत अधिकारी यांच्यावर प्रत्येक नोडमधील प्रभाग अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून ऑगस्ट १९९९ पासून हे सुर्वेक्षण, शोध व बांधकाम निष्कासित करणे याकामात सहभागी होत आले आहेत. अनधिकृत बांधकाम आढळल्यास त्याबाबतचा अहवाल नियंत्रक अनधिकृत बांधकामे यांना सादर केला जातो. त्यानंतर सर्व्हेयर व ड्राफ्टस्मन त्या स्थळी जाउन स्थळ, सर्वे क्रमांक, भूखंड क्रमांक, अनधिकृत बांधकामाचे मोजमाप व त्याचा वापर यांचा प्रत्यक्षदर्शी तपशील गोळा करतात. या तपशीलाबरहुकूम सहाय्यक नियंत्रक अनधिकृत बांधकामे विभाग क्रमांक ५३, ५३ व ५५ एमआर अँड टीपी अधिनियम अन्वये अनधिकृत बांधकामांशी संबधित व्यक्तींना नोटीस बजावतात.कायद्याच्या तरतुदीनुसार १५ ते ३२ दिवसांच्या अवधीत सदर नोटिशीच्या प्रत्युत्तरादाखल संबधित व्यक्तीने कृती न केल्यास अनधिकृत बांधकामांच्या यादीत त्या बांधकामाचा समावेश केला जातो.
बॉक्स :- सिडको हद्दीतील अनेक अनधिकृत इमारतींच्या तक्रारी सिडको कार्यालयात प्राप्त असतांनाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही,कारवाई कधी होणार यावर प्रश्नचिन्ह आहे.
बॉक्स :- बेलापूर कार्यालय सहा.आयुक्त तथा विभाग अधिकारी डॉ. अमोल पालवे, सहा. अभियंता आत्माराम काळे, यांच्या हद्दीत असणाऱ्या करावे गाव, दारावे गाव, बेलापूर गाव, शहाबाज गावात अनेक अनधिकृत बांधकामे असून त्यावर कारवाई का करत नाही यावर प्रश्नचिन्ह आहे.त्याचबरोबर याच विभागात मोठ्या प्रमाणात बार, रेस्टोरंट, हॉटेल यांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून याकडेही त्यांचे दुर्लक्ष असल्याने कारवाई का करत नाहीत यावर प्रश्नचिन्ह आहे.
बॉक्स :- सिडको व न.मु.म.पा च्या अतिक्रमण विभागाकडून अनेक इमारतींवर तोडकं कारवाई करण्यात आली आहे,त्या थातुर मातुर कारवाई असल्याने आजमितीस अनेक अनधिकृत इमारती पुन्हा पूर्ण होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येत आहेत.
बॉक्स :- प्रशासनाच्या मिळणाऱ्या पगारावर जगायचे सोडून अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर जगणाऱ्या नवी मुंबई महापालिका अतिक्रमण विभागाच्या व सिडको अतिक्रमण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांची खातेनिहाय चौकशी व्हायला हवी अशी मागणी नागरिकांकडून होऊ लागली आहे.
