नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच

नाशिक (रेणुका गायकवाड - महाले) :- स्मार्ट सिटी योजनेत नाशिक शहराचाही सहभाग असून शहराला स्मार्ट बनवण्याचे काम स्मार्ट सिटी कंपनीला देण्यात आले आहे.या कामांमध्ये दहा महत्त्वपूर्ण विकास प्रकल्पाचा समावेश असून ते गेल्या सात वर्षात अजूनही पूर्णत्वास आलेले नाहीत.त्यामुळे आजही नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत २०१६ साली स्मार्ट सिटी कंपनीला नाशिक शहराची विकास कामाचे करण्याचे टेंडर देण्यात आले.परंतु गेल्या ७ वर्षात ७९० कोटी रुपये खर्च करून अजूनही स्मार्ट सिटी कंपनीला नाशिक शहराचे विकास प्रकल्प पूर्ण करता आलेली नाहीत.२-३ वेळा मुदतवाढ मिळूनही प्रलंबित कामे पूर्ण करण्यास कंपनी जाणीवपूर्वक उशीर करत आहे व स्वतःच्या फायद्यासाठी अजुनही मुदत वाढ मिळवण्याचा प्रयत्न सुरूच आहे. प्रलंबित विकास कामे पूर्ण न झाल्यामुळे १ एप्रिल पासून कोणतेही नवीन टेंडर काढू नये असे स्पष्ट निर्देश शासनाने स्मार्ट सिटी कंपनीला दिले आहे.

                 स्मार्ट सिटी होने तर दूरच परंतु संपूर्ण शहरांमध्ये विकास कामांच्या नावाखाली जागोजागी रस्त्यावर मोठमोठे खड्डे व खोदकाम करून अर्धवट ठेवण्यात आले आहे, अशा अर्धवट खोदलेल्या रस्त्यांमुळे  असंख्य वेळा रस्ते अपघात झाले अनेकांनी गेल्या सात वर्षांमध्ये अशा रस्ते अपघातामध्ये स्वतःचा जीव सुद्धा गमावला आहे परंतु निष्काळजी शासकीय अधिकाऱ्यांचे व स्मार्ट सिटी कंपनीने नेहमीच याकडे दुर्लक्ष केले आहे.विकास प्रकल्प प्रलंबित ठेवून जाणीवपूर्वक मुदतवाढ करणे व आलेला निधी फस्त करणे असले प्रकार स्मार्ट सिटी कंपनीकडून नेहमीच घडत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जनतेच्या तोंडाला पाने पुसणाऱ्या या कंपनी व अधिकाऱ्यांविरोधात नाशिककरांनी तीव्र नारजी दाखवत त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवला आहे.प्रलंबित विकास कामे आधी पूर्ण करून संपूर्ण नाशिक शहर प्रथम खड्डे मुक्त करावे असे नागरिकांचे म्हणणे आहे. विकास कामे वेळेत पूर्ण न करू शकलेल्या कंपन्यांना पुन्हा टेंडर न देता शासनाने दुसऱ्या कंपनीला कामे देऊन वेळेत सर्व विकासकामे पूर्ण करून घ्यावेत.शासकीय अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून शहरातील विकास कामांमध्ये लक्ष दिले तर गेल्या सात वर्षापासून प्रलंबित स्मार्ट सिटी चे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल असे नाशिककरांचे मत आहे.