आमदार बच्चू कडू यांचे नवी मुंबईत स्नेहभोजन तर शिवसेच्या दोन्ही गटांवर टीकास्त्र , सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात शिंदे सरकार २०२४ पर्यत टिकणार असल्याची प्रतिक्रिया.

नवी मुंबई :- राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार असल्याने राज्यातील प्रमुख नेत्यांकडून विविध तर्क वितर्क लावले जात आहेत.त्याचवेळी या सर्व तर्क वितर्कांना काहीही अर्थ नसल्याचे सांगत २०२४ पर्यंत शिंदे सरकारला कोणताही धोका नसल्याचे विधान आमदार बच्चू कडू यांनी नेरुळ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात केले.या कार्यक्रमानंतर बच्चू कडू यांनी प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रवीण खेडेकर यांच्या घरात स्नेहभोजन घेत पुन्हा आपण नेता नसून एक जनसेवक असल्याची प्रचिती दिली.यावेळी पक्षाच्या कामगार संघटनेचे ठाणे जिल्हाअध्यक्ष चंद्रकांत उतेकर यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

                आयोजित कार्यक्रमात बोलतांना आमदार बच्चू कडू यांनी सांगितले की राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकरच लागणार आहे. याच आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे. मात्र निकालांनंतर सरकार स्थिर राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल काही येऊ दे, सरकार हेच राहील.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंधरा आमदार अपात्र होणार नाहीत.त्यांनी तसे न्यायालयात ठोस कगदपत्रं सादर केली आहेत, त्यामुळे हे सरकार स्थिर राहणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला आहे.यावेळी बोलतांना त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे व शिंदे गट यांच्यावरही निशाणा साधला आहे. एकाने सभा घेतली की दुसरा सभा घेतो हा मूर्खपणा असल्याचं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.सभा घेण्याची स्पर्धा त्यांच्यात लागली असून त्यात जनतेचे हित काय,फक्त स्वतःचा स्वार्थीपणा.एकाने सभा घेतली कि दुसऱ्याने लगेच घेतली पाहिजे,कोणाची गर्दी किती यावरच सध्या राजकारण सुरु आहे.मात्र आम्ही आमचा पक्ष हा या भानगडीत न पडता जनतेची सेवा कशी होईल,त्याचा जनतेला फायदा कसा होईल याची काळजी घेतो.सभेला नागरिक येतात व जातात मात्र सोबत कोणी राहत नाही,आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी फक्त निष्ठावंतच येतात असे यावेळी बच्चू कडू यांनी स्पष्ट केले.शिंदे गटासोबत गेल्याने मंत्रिमंडळात वर्णी लागेल अशी अपेक्षा होती मात्र त्याही पेक्षा जास्त मला शिंदे सरकार कडून मिळालं.थेट दिव्यांग मंत्रालयाची स्थापनाच झाल्याने अजून त्यापेक्षा मोठं काय असू शकतं. माझे मंत्रिपद गेले,मला अजूनही मंत्रीपद मिळालेले नाही तरी मी खूश आहे. कारण दिव्यांगांसाठी मंत्रालयाची स्थापना झाली. सध्या तरी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं वाटत नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार हा आता 2024 नंतरच होईल असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बच्च कडून यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. आम्ही पहिल्यांदा गुवाहाटीला गेलो तेव्हाच दिव्यांग मंत्रालयाचा विषय पुढे आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा गेलो तेव्हा दिव्यांग मंत्रालयाची स्थापना झाली. इथे खोक्याचा विषय नाही. मागचे सरकार होते तेव्हा अडीच वर्षांत दिव्यांगांची फाईल पुढे सरकली नाही. अनेकदा अजित पवारांकडे फाईल घेऊन गेलो, काहीच झालं नाही. आम्ही सरकारला पाठिंबा देऊनही आमच्याच फाईल अडकल्या होत्या. पैसे घेऊन फाईल पुढे सरकत होत्या असा खळबळबजनक आरोप यावेळी बच्चू कडू यांनी केला आहे.