नवी मुंबई :- शिरवणे गावातील बेकरी जवळ असलेल्या साई माउली अपार्टमेंट इमारतीच्या समोर रोडलगत अनधिकृत बांधकाम सुरु असता नेरुळ विभागाकडून त्यावर काही दिवसांपूर्वी कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर पुन्हा त्याच जागेवर बांधकाम सुरु झाल्याने भूमाफिया कारवाईला घाबरत नसल्याचे दिसून येत आहे.या इमारतीच्या समोर लाखो रुपये खर्च करून रस्त्याचे काम करण्यात आले असून अनधिकृत इमारतीच्या बांधकामामुळे रस्त्याचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे भविष्यात सामान्य नागरिकांची होणारी फसवणूक पाहता या इमारतीवर तत्काळ कारवाई व्हायला हवी अशी मागणी होत आहे.शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामाचे जाळे तयार होत असल्याने त्याला नियंत्रणात आणण्यासाठी सिडकोने कारवाईचा धडाका लावला आहे.शहरातील अनेक अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवत असतांना अनेकांना नोटीस बजावण्याचे कामही सिडको कडून करण्यात येत आहे.अनधिकृत होर्डिंग, अनधिकृत इमारती अथवा पब किंवा बार यांच्या बेकायदेशीर कृत्यांमुळे आजमितीस अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत तर अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. ज्यावेळी घटना घडतात त्यावेळी शासन ,प्रशासन यंत्रणा खळबळून जागी होते आणि कारवाया सुरु होतात.जरी कारवाया सुरु असल्या तरी अधिकारी हातचा राखून कारवाया करत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.नवी मुंबई शहरात बहुतांश अनधिकृत इमारती उभ्या राहत असून त्यावर विविध विभाग कार्यालयात तक्रारी प्राप्त आहेत.
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु