नैना प्रकल्पाच्या नगर रचना परियोजना - ६ करीता जमीन मालकांची नियोजित सभा डिजिटल माध्यमातून पार पडणार  -कोरोना व टाळे बंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोचा निर्णय


नवी मुंबई - कोरोना अर्थात कोविड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सुरू असलेल्या देशव्यापी टाळे बंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोच्या नवी मुंबई विमानतळ प्रभाव अधिसूचित क्षेत्र (नैना) प्रकल्पातील नगर रचना परियोजना-६ (टीपीएस-६) करीता एप्रिल, २०२० मध्ये नियोजित असलेली जमीन मालकांची सभा ही डिजिटल माध्यमातून पार पाडण्याचा निर्णय सिडकोतर्फे घेण्यात आला आहे. या अंतर्गत सदर परियोजनेचे सर्व तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर व व्हॉटसअपच्या माध्यमातून जमीन मालकांकरिता उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
                 नैना प्रकल्पाकरिता विशेष नियोजन प्राधिकरण असलेल्या सिडकोने नैनाच्या मंजूर अंतरिम विकास आराखड्याची अंमलबजावणी नगररचना परियोजनेच्या माध्यमातून हाती घेतली आहे. सुमारे ३६८३ हेक्टर क्षेत्राच्या अंतरिम विकास आराखड्यामधील सुमारे २९७१ हेक्टर क्षेत्र नगर रचना परियोजनेखाली विकसित होणार आहे. या आराखड्यातील नगर रचना परियोजना - १ (टीपीएस-१) चा प्रिलिमिनरी आराखडा शासनाने मंजूर केला आहे. तर टीपीएस-२ व टीपीएस-३ परियोजनांचे प्रारूप आराखडे मंजूर झाले आहेत. तसेच टीपीएस-४ व टीपीएस-५ चे कच्चे आराखडे मार्चच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जमीन मालकांच्या सभेत सूचना व हरकती प्राप्त करून नगर रचना संचालनालय, पुणे येथे सल्लामसलतीसाठी निर्गमित केले आहेत. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमातील कायदेशीर तरतुदींनुसार नगर रचना परियोजनेचे सर्व  टप्पे विहित वेळेत पूर्ण करणे प्राधिकरणास बंधनकारक असते. या वेळापत्रकानुसार नगर रचना परियोजना-६ तयार करण्याचा इरादा दि. ८ऑगस्ट २०१९ रोजी जाहीर करण्यात आला असल्यामुळे त्यासंबंधीची जमीन मालकांची सभा माहे एप्रिल २०२० पर्यंत घेणे बंधनकारक आहे. मात्र कोविड-१९ विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी दि. २५ मार्च २०२० पासून देशव्यापी टाळेबंदी लागू आहे. अशा परिस्थितीत सिडको आपल्या अभ्यागतांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सदर जमीन मालकांची सभा प्रत्यक्षरित्या घेऊ शकत नाही. मात्र जमीन मालकांच्या सुविधेसाठी सिडकोतर्फे या परियोजनेचे सर्व तपशील आपले संकेतस्थळ व व्हाट्सअपच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टीपीएस-६ विषयीचे सर्व नकाशे व भूखंडांची माहिती दि. २४ एप्रिल २०२० ते दि. ४ मे २०२० दरम्यान जमीन मालकांना सिडकोच्या https://cidco.maharashtra.gov.in/naina या संकेतस्थळावर घरबसल्या पाहता येईल. नगर रचना परियोजना-६ संदर्भातील कच्चा आराखडा तसेच प्रस्तावित भूखंडांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तसेच संबंधित जमीन मालक आपल्या सूचना व हरकती ई-मेल अथवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून सिडकोकडे पाठवू शकतील. सुमारे २४३ हेक्टर परिसरावर नियोजित टीपीएस - ६ परियोजनेत पनवेल तालुक्यातील मौजे चिखले, मोहो, शिवकर व पाले खुर्द या गावांतील क्षेत्राचा समावेशआहे. या परियोजनेच्या सुमारे ३७.७ टक्के क्षेत्रावर शाळा, खेळाची मैदाने, ग्रोथ सेन्टर, मध्यवर्ती उद्यान, सार्वजनिक आरोग्यकेंद्रे, रोज बाजार, स्मशान भूमी इ. सुविधांचे आरक्षण आहे. सदर परियोजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यामधील ग्रोथ सेन्टरच्या क्षेत्राला मल्टि-मोडल कॉरिडॉरवरून तसेच नैना स्पाईन रोडवरून थेट प्रवेश असेल.सदर परियोजनेचा तपशील डिजिटल माध्यमाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने जमीन मालकांना हा तपशील आपल्या घरी सुरक्षित राहून सोईस्करपणे पाहता येणार आहे. संकेतस्थळावरील माहिती पाहताना कोणतीही अडचण आल्यास व्हॉट्सअपवर संपर्क साधणे देखील शक्य होणार आहे. टीपीएस-६ मध्ये समाविष्ट सर्व जमिनींची यादी तसेच मूळ भूखंड व अंतिम भूखंडाचे नकाशे सुलभरीत्या संकेतस्थळावर पाहता येतील. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जमीन मालकांनी आपल्या घरीच राहावे व डिजिटल माध्यमातून माहिती घेऊन सहकार्य करावे असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे. 


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू