कोरोना विषयक खबरदारी घेत एपीएमसी सुरू राहिली तर हरकत नाही - आमदार गणेश नाईक


नवी मुंबई - कोरोनाचा संसर्ग वाढू नये त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेत एपीएमसी मार्केट सुरू राहिले तर आमची काहीच हरकत नाही परंतु जर पुन्हा एकदा बेपर्वाही झाली तर नवी मुंबईकरांसाठी सोशल डिस्टन्स पाळून प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती बंद करण्यासाठी मोर्चाही काढू, असा इशारा लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिला आहे.नवी मुंबईतील कोरोना संसर्गाचे एपीएमसी सर्वात मोठे हॉटस्पॉट ठरले आहे. शहरातील कोरोनाचा आकडा 1200 वर पोहोचला असताना यापैकी सुमारे 400 रूग्ण हे एपीएमसी आवारात बाधित झालेले आणि एपीएमसी आवारात लागण झालेल्यापासून त्यांच्या कुटुंबीयांना आणि समाजातील इतर व्यक्तींना बाधा झालेले आहेत.
                   एपीएमसीमध्ये व्यापार करताना सोशल डिस्टन्स पाळले जात नव्हते. बाजारात येणाऱ्यांची तपासणी होत नव्हती. कोरोनाचा संसर्ग वाढविण्यास कारणीभूत ठरणाऱ्या एपीएमसी मधील व्यापार पद्धतीला लोकनेते आमदार नाईक यांनी आक्षेप घेत या रोगाची साखळी तोडायची असेल तर एपीएमसी बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार 11 मे ते 18 मे या कालावधीमध्ये एपीएमसी बंद करण्यात आली होती. एपीएमसी पुन्हा सुरू झाल्यावर 19 मे रोजी लोकनेते आमदार नाईक यांनी एपीएमसी मधील दाणाबंदर बाजाराचा पहाणी दौरा केला. यावेळी बाजार आवारात येणाऱ्या जाणाऱ्यांच्या तापाची आणि शरीरातील ऑक्सिजनची तपासणी सुरू असल्याचे दिसून आले. सोशल डिस्टन्स पाळण्यात येत होते. तसेच निर्जंतुकीकरण केले जात होते. बाजार आवारामध्ये पोलीस, एपीएमसी प्रशासन आणि व्यापाऱ्यांच्या यंत्रणेमार्फत खबरदारीचे उपाय योजण्यात येत आहेत अशी माहिती लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी दिली. एपीएमसी मधून मुंबई आणि उपनगरांना भाजीपाला आणि धान्याचा पुरवठा होतो. तो सुरळीत राहिला पाहिजे या मताचे आम्ही आहोत मात्र त्याच बरोबर एपीएमसी मधून कोरोनाची लागण नवी मुंबई शहरात वाढता कामा नये, असा मागणीवजा इशारा देत लोकनेते नाईक यांनी असे झाले तर नवी मुंबईकरांच्या जीवित रक्षणासाठी आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असे सांगितले.यावेळी नाईक म्हणाले,”नवी मुंबईत राहणारे आणि मुंबईतील अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था मुंबई महापालिकेने मुंबईतच करावी अशी मागणी केलेली आहे. कोरोना योद्ध्यांच्या कार्याला आमचा सलाम आहे परंतु त्यांच्या जीविताचे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या, समाजाच्या  रक्षणासाठी निर्णय घ्यावाच लागेल. चुकांमधून सुधारणा केल्यास परिस्थितीमध्ये नक्कीच सकारात्मक बदल घडू शकतात.”


सिडको प्रदर्शनी केंद्रातील कोरोना रुग्णालयाची पाहणी....
लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी मागणी केल्यानुसार वाशीतील शिडको प्रदर्शनी केंद्रात 1100 खाटांचे कोरोना रूग्णालय महापालिकेच्यावतीने उभे राहत आहे. या रुग्णालयाचा पाहणीदौरा लोकनेते नाईक यांनी केला. या ठिकाणच्या सोयीसुविधांची माहिती घेऊन कामाला गती द्या अशी सुचना त्यांनी याप्रसंगी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केली.


पालिकेतील कोरोना रुग्णालय सिडको प्रदर्शनी केंद्रात हलवावे...
वाशी येथील पालिकेचे प्रथम संदर्भ रुग्णालय कोरोना रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पावसाळा लवकरच सुरू होणार आहे. पावसाळ्यात साथीचे आणि इतर आजार डोके वर काढतात. अशा परिस्थितीमध्ये प्रथम संदर्भ रुग्णालय नवी मुंबईकरांसाठी सर्व आजारांवर उपचारासाठी मोठा आधार असतो. हेच रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून कार्यरत असल्याने इतर आजारांसाठी त्यामध्ये उपचार करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत. त्याकरिता हे कोरोना रुग्णालय वाशी येथील प्रदर्शनी केंद्रात हलवावे आणि प्रथम संदर्भ रुग्णालय पूर्वीप्रमाणेच सर्व प्रकारच्या आजारांवर उपचार करण्यासाठी खुले ठेवावे, अशी मागणी लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी केलेली आहे.


डायलिसिस करणे पालिका रुग्णालयाची जबाबदारी..
महापालिकेच्या वाशी येथील रुग्णालयांमधून वेळेवर डायलेसिस न मिळाल्याने तुर्भे येथे राहणारे उपेंद्र तिवारी ( वय 35) यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेची माहिती पाहणी दौरा प्रसंगी पत्रकारांनी लोकनेते नाईक त्यांना दिली असता या प्रकरणी आपण चौकशी करण्यासाठी पालिका प्रशासनाला पत्र देणार आहे चौकशीअंती जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी केल्याचे लोकनेते नाईक यांनी सांगितले. तिवारी डायलिसिस साठी रुग्णालयात गेले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीचा अहवाल मिळण्यासाठी पाच दिवस गेले या दरम्यान डायलिसिस न झाल्याने तिवारी यांना जीव गमवावा लागला.


परप्रांतीय मजुरांना मूळगावी पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील....
नवी मुंबईतून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी शेकडो परप्रांतीय मजूर प्रतीक्षेत आहेत. नवी मुंबई मधून या मजुरांसाठी अद्याप एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. नवी मुंबईतील परप्रांतीय मजुरांसाठी प्रवासाची सोय उपलब्ध व्हावी यासाठी पोलिस प्रशासन आणि कोकण विभागीय प्रशासनाबरोबरच  बोलणी सुरू असल्याची माहिती लोकनेते आमदार गणेश नाईक यांनी याप्रसंगी दिली.या पाहणी दौऱ्याप्रसंगी लोकनेते नाईक यांच्यासमवेत  महापौर जयवंत सुतार,माजी महापौर सुधाकर सोनावणे,सभागृह नेता रविंद्र इथापे,स्थायी समिती सभापती नवीन गवते,नगरसेवक डॉ. जयाजी नाथ,नगरसेविका नेत्रा शिर्के, माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, समाजसेवक राजेश मढवी आदी उपस्थित होते