गणेशोत्सव व नवरात्रौत्सवर कोरोनाचे सावट,राज्य शासनाच्या सूचना जाहीर 


नवी मुंबई - यंदा गणेशोत्सव 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत तसेच नवरात्रौत्सव 17 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत साजरा होत असून यावर्षी कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणेकरीता शासनाच्या गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या आहेत.यात गणेशोत्सव व नवरात्रोत्सव कशी साजरी करावी याची नियमावली जाहीर केली आहे.


                सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार गणेशोत्सवासाठी यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.कोविड-19 मुळे उदभवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमीत केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबधीत स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत. या वर्षीचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतींची सजावट करतांना त्यात भपकेबाजी नसावी.श्रीगणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरीता 4 फूट व घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी.यावर्षी शक्यतो पारंपारिक गणेशमुर्तीं ऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मुर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मुर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्षीच्या विसर्जनाच्या वेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरुन आगमन / विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळून स्वत:चे व कुटूंबियांचे साथीच्या रोगापासून रक्षण होईल.उत्सवाकरीता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे उदा. रक्तदान आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याव्दारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.श्रीगणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादींव्दारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी.गणेशोत्सव मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची तसेच थर्मल स्क्रीनिंगची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणा-या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजीकल डिस्टन्सींग) तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क,सॅनिटायझर इ.) पालन करण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन, विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ  नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील / इमारतीमधील सर्व घरगुती गणेशमुर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी.कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैदयकिय शिक्षण विभाग तसेच संबधीत महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करण्यात यावे.
                  नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक 173/2010 संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार महानगरपालिकेने विकसित केलेल्या “इ-सेवा संगणक प्रणाली” व्दारे गतवर्षीप्रमाणे या वर्षीही मंडप उभारणेची परवानगी देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.सर्व गणेशोत्सव/नवरात्रौत्सवमंडळे व नागरिकयांनी नवी मुंबई महापालिकेच्यावेबसाईट वर गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज करण्यास 25 जुलै  पासून कार्यालयीन वेळेमध्ये ऑनलाईन सेवा सुरु करण्यात येत आहे. तसेच नवरात्रौत्सवासाठी सुध्दा याच वेबसाईट  वर मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. ऑनलाईन प्रणालीव्दारे दोन्ही उत्सवाच्या 10 दिवस अगोदर परवानगी देणे बंद करण्यात येणार आहे, याची नोंद घेण्यात यावी.गणेशोत्सव व नवरात्रौत्सव या करीता सर्व संबधीत विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करण्यात येऊ नये. तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरण्यात येऊ नये. रितसर परवानगी शिवाय मंडपाची उभारणी सुरु करु नये. महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपांवर निष्कासनाची कार्यवाही केली जाईल. सर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ व नागरीकांनी याची दक्षता घ्यावयाची आहे.मंडप उभारणी परवानगी अर्ज नमूद कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे www.rtsnmmconline.com या Website वर ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नये. विशेष करुन गणेशोत्सव / नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळानी याची नोंद घ्यावी. उत्सव सुरु होण्याच्या 10 दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारणेसाठी परवानगी दिली जाणार नाही.या संदर्भात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यासाठी व याबाबत सविस्तर माहिती देणेकरीता नवी मुंबई महानगरपालिकेच्या बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा या ८ विभाग कार्यालयांमध्ये संबधीत सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी तसेच स्थानिक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत  25 जुलै  रोजी ११ वाजता, आठही ठिकाणी विभाग स्तरावर बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.


 


Popular posts
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image