कोव्हीड-19 च्या पार्श्वभूमीवर 23 मुख्य विसर्जन स्थळांव्यतिरिक्त 135 कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती


नवी मुंबई - कोव्हीड - 19 च्या पार्श्वभूमीवर साज-या होणा-या गणेशोत्सवाकरिता 11 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने निर्गमित केल्या मार्गदर्शक सूचना यापूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या आहेत. तसेच महापालिका विभागीय स्तरावर श्रीगणेशोत्सव मंडळांची पोलीस व वाहतुक पोलीस विभागासह बैठकही घेण्यात आलेली आहे.याविषयी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनीही विशेष बैठकीचे आयोजन करून गणेशोत्सव सुव्यवस्थित रितीने संपन्न व्हावा व कोव्हीड 19 विषयक सुरक्षा उपाययोजनांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता मार्गदर्शक निर्देश दिले होते. त्यास अनुसरून विभागीय स्तरावर श्रीगणेशोत्सव आयोजनाविषयी कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे.


                नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 23 पारंपारिक विसर्जनस्थळे ( बेलापूर - 5, नेरूळ - 2, वाशी - 2, तुर्भे - 3, कोपरखैरणे - 3, घणसोली - 4, ऐरोली - 3, दिघा - 1) असून  याठिकाणी स्वयंसेवक, लाईफगार्डस् तैनात असणार आहेत.‘तलाव व्हिजन’ अंतर्गत मुख्य 14 तलावांमध्ये श्रीमुर्तींचे विसर्जन करण्यासाठी गॅबियन वॉलची रचना करण्यात आलेली असून भाविकांनी व श्रीगणेशोत्सव मंडळांनी दरवर्षीप्रमाणे याच ठिकाणी श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करावे व पर्यावरण रक्षण, संवर्धनासाठी हातभार लावावा असे आवाहन आहे.प्रत्येक विसर्जनस्थळांवर पुरेशा विद्युत व्यवस्थेसह जनरेटरची पर्यायी व्यवस्था तसेच प्रथमोपचार कक्ष असणार आहे. विसर्जनस्थळांवर विसर्जनासाठी येणा-या नागरिकांकरीता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून सुविधा मंचही उभारण्यात येत आहे.घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सर्व विसर्जनस्थळांवर ओल्या व सुक्या निर्माल्यासाठी दोन स्वतंत्र निर्माल्य कलश ठेवण्यात येत असून प्रसादाच्या फळांसाठी वेगळ्या कॅरेटची व्यवस्था करण्यात येत आहे. हे प्रसाद साहित्य व फळे ही गरजू मुले व नागरिकांना वितरित करण्यात येणार आहेत.निर्माल्याची नियमित वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली असून निर्माल्याचे पावित्र्य राखण्याची काळजी घेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी तुर्भे येथील प्रकल्पस्थळी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.पारंपारिक 23 विसर्जन स्थळांव्यतिरिक्त यावर्षीची कोव्हीड 19 साथरोगाची परिस्थिती विचारात घेता गर्दी पूर्णत: टाळली जावी व सोशल डिस्टन्सींगचे पालन व्हावे यादृष्टीने साधारणत: 6 पट अधिक म्हणजेच 135 कृत्रिम विसर्जन तलाव विभागवार तयार करण्यात आले आहेत.यामध्ये - बेलापूर विभागात - 15, नेरूळ विभागात - 27, वाशी विभागात - 16, तुर्भे विभागात - 17, कोपरखैरणे विभागात - 14, घणसोली विभागात - 17, ऐरोली विभागात - 22 व दिघा विभागात - 7 अशा प्रकारे एकूण 135 कृत्रिम विसर्जन तलावांची तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आली आहे. विभागनिहाय कृत्रिम विसर्जन तलावांच्या स्थळांबाबतची माहिती त्या त्या विभागांमध्ये होर्डींगव्दारे प्रसिध्द करण्यात येत असून व्हॉट्सॲप तसेच महानगरपालिकेची वेबसाईट, फेसबुक, ट्विटर अशा सोशल मिडियावरूनही या ठिकाणांची प्रसिध्दी करण्यात येत आहे.या कृत्रिम विसर्जन तलावांच्या ठिकाणीही 23 मुख्य विसर्जन तलावांप्रमाणेच श्रीमूर्ती विसर्जनासाठी स्वयंसेवक, सुरक्षारक्षक असणार असून सुके व ओले निर्माल्य ठेवण्यासाठी स्वतंत्र निर्माल्य कलश असणार आहेत.प्रतिबंधित क्षेत्र - 3 ( Containment Zone - 3 ) यामध्ये राहणा-या नागरिकांकडील श्रीगणेशमूर्ती विसर्जनासाठी या कन्टेनमेंट झोनच्या प्रवेशव्दाराजवळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाच्या वतीने श्रीमूर्ती संकलित केल्या जाणार असून त्याचे सुयोग्य रितीने विसर्जन केले जाणार आहे.नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नागरिकांना श्रीगणेशोत्सव उत्साहाने साजरा करता यावा यासाठी नियोजन करण्यात आले असून सुजाण नवी मुंबईकर नागरिकांनी यंदाची कोव्हीड 19 ची परिस्थिती लक्षात घेऊन "मी पण कोव्हीड योध्दा' या भूमिकेतून मास्कचा नियमित वापर करावा, सोशल डिस्टन्सींग राखावे, नेहमी स्वच्छ हात धुवावेत अशाप्रकारे स्वयंशिस्तीचा अवलंब करावा आणि सुरक्षाविषयक इतर बाबींचे पालन करावे. तसेच शासनाच्या गणेशोत्सव विषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करीत आपल्याला कोरोनाची लागण होणार नाही व आपल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घ्यावी आणि यावर्षीचा गणेशोत्सव आरोग्योत्सव स्वरूपात साजरा करावा असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.


Popular posts
शिरवणे गावातील बेकायदेशीर लॉजिंगला आशीर्वाद कोणाचा ? , ग्रामस्थांची नाराजी तर मनपाची कारवाईला दिरंगाई
Image
भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ जामनेर मध्ये, भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
Image
केटी ग्रुप, एलके ग्रुप व मिलेनियम इन्फ्रावर कारवाई करण्याची मागणी, सिडको व महारेरा ची फसवणूक, ग्राहकांचे करोडो रुपये परत देण्याची मागणी, कारवाई न झाल्यास सिडको कार्यालयासमोर आत्मदहन
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
दिवाळी अगोदर अनधिकृत बांधकामे पूर्ण करण्यासाठी भूमाफिया आक्रमक , अतिक्रमण अधिकाऱ्यांची दिवाळी जोमात ? , लवकर कामे पूर्ण करा, विभाग कार्यालयाकडून छुपा आदेश ?
Image