विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार
नवी मुंबई - कोरोना महामारीचा शालेय विद्यार्थी वर्गावर परिणाम होत असल्याने अनेक विद्यार्थी व त्यांचे पालक विविध माध्यमांद्वारे शासन आणि प्रशासनाकडून मदत मागताना दिसत आहेत. तसेच कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने महाविद्यालय, शाळा आणि अनेक खाजगी शिक्षण संस्था बंद ठेवत "ऑनलाईन अभ्यास" विद्यार्थ्यांसाठी सुरु केले व महाविद्यालय आणि शाळांना सदर प्रक्रिया सहजतेने अमलात आणण्यास आवाहन केले आहे.परंतु विद्यार्थी, पालक तसेच शिक्षकांसाठी ही क्रांती श्रेणीसुधारित आणि अद्यावत असल्यामुळे त्यांना विविध पातळीवर संघर्ष करावा लागत आहे. कित्येक विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान उपकरणाच्या अभावामुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.विद्यार्थी व पालकांच्या अशा अनेक समस्या असून त्या नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशन च्या वतीने महाविद्यालय तसेच शाळा प्रशासनासमोर मांडण्यात येणार आहेत.
विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शैक्षणिक शुल्कामध्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार योग्य सवलत मिळावी, शैक्षणिक शुल्क भरण्यास विलंब होत असल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित न ठेवता सहानुभूतीपूर्वक योग्य सहकार्य करावे, शैक्षणिक शुल्कावरून विद्यार्थी व त्यांच्या पालकांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकण्यात येवू नये, विद्यार्थ्यांकडून घेण्यात येणारे शैक्षणिक शुल्क वाजवी तसेच काही टप्प्यांमध्ये असावे, ज्या गोष्टींचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येत नसेल अशा गोष्टींचे शुल्क माफ करण्यात यावे, महाविद्यायातून प्रवेश प्रक्रियेदरम्यान योग्य ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना देत संबंधित त्रुटींचे निराकरण करावे.या सूचनांबाबत आपल्या प्रशासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करून सदर समस्यांचे गांभीर्य लक्षात घेता त्याचे लवकरात लवकर निराकरण करत त्या सर्व पालकांना आणि विद्यार्थ्याना दिलासा द्यावा अशी अपेक्षा नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशने व्यक्त केली आहे.
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार