नवी मुंबई - सिडको महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ.संजय मुखर्जी आज रूजु झाले. त्यांनी मध्यानपूर्व सिडकोच्या मुंबईमधील निर्मल भवन कार्यालयात सिडकोचे पूर्वीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्याकडून सिडको महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदाची सूत्रे स्वीकारली.
या प्रसंगी सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक अश्विन मुद्गल, सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे, सहव्यवस्थापकीय संचालक अशोक शिनगारे व मुख्य दक्षता अधिकारी निसार तांबोली उपस्थित होते. सिडकोच्या सेवेत रुजू होण्यापूर्वी डॉ. संजय मुखर्जी वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन व सांस्कृतिक कार्य विभागात, सचिव या पदावर कार्यरत होते. 1996 च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडर मधील भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी डॉ. संजय मुखर्जी मूळचे नागपूरचे असून त्यांनी नागपूर येथील गव्हर्नमेंट मेडीकल कॉलेजमधून (बॅचलर ऑफ सर्जरी) एमबीबीएस, अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथून पब्लिक फायनॅन्सवर शॉर्ट टर्म कोर्स, इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनॅन्शिअल ॲनालिस्ट ऑफ इंडिया येथून फायनॅन्स विषयात चार्टर्ड फायनॅन्शिअल ॲनालिस्ट व टोरॅन्टो विद्यापीठातून पब्लिक ॲमिनीस्ट्रेशन व फायनॅन्स विषयावर पदवी संपादन केल्या आहेत. डॉ. संजय मुखर्जी यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प), राज्य उत्पादन शुल्क विभागात आयुक्त, महाराष्ट्र एयरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी येथे सहव्यवस्थापकीय संचालक, जळगाव महानगरपालिकेत आयुक्त तर नागपूर महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे.
सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक पदावर डॉ. संजय मुखर्जी रुजू
• Yogesh dnyneshwar mahajan