नवी मुंबई :- दारावे गावातील वरील अनधिकृत इमारतीवर दोन महिन्या पूर्वी मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून तोडकं कारवाई करण्यात आली असल्याची माहिती मनपा अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड यांनी दिली होती.त्या कारवाई नंतर तीच अनधिकृत इमारत पुन्हा थाटात उभी राहिल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे मनपाच्या कारवाईवर नागरिकांकडून संशय व्यक्त करण्यात येत आहे.
अनधिकृत बांधकामांमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असून अनेकांची फसवणूक झाल्याचेही उघडकीस आले आहे.मनपा व सिडकोकडून अनधिकृत इमारतींवर कारवाई जरी करण्यात येत असली तरी अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून तेवढाच भ्र्रष्टाचार होत असल्याचेही उघडकीस आले आहे. दारावे गावातील शिव मंदिराच्या बाजूला असलेल्या जी + २ या अनधिकृत इमारतीवर नवी मुंबई मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून दोन महिन्या पूर्वी तोडकं कारवाई करण्यात आली होती.सदरील जागा हि एम एस ई बी ची असल्याची चर्चा गावात आहे.या मोकळ्या जागेवर अनधिकृत इमारतीचे काम सुरु असल्याची माहिती मिळताच मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली होती.त्यानंतर पुन्हा या अनधिकृत इमारतीचे काम सुरु झाल्यास आजमितीस ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसून येत आहे.यावेळी तोडकं कारवाई करणाऱ्या मनपाचा अतिक्रमण विभाग, बेलापूर विभाग कार्यालय अतिक्रमण विभाग काय करतोय यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.
