खाजगी रूग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करण्याचे आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश     


नवी मुंबई - कोरोना बाधितांवरील वैद्यकीय उपचारांसाठी खाजगी रूग्णालयांनी महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार देयक रक्कम आकारावी याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 'हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रूग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)' यांना 10 ऑगस्ट रोजी आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.तथापि काही रूग्णालयांकडून या आदेशाचे व 21 मे आणि 31 ऑगस्ट  रोजीच्या शासन अधिसूचनेचे उल्लंघन करण्यात येऊन जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.अश्या प्रकारच्या तक्रारी रूग्ण तसेच त्यांचे नातेवाईक यांचेकडून महानगरपालिकेस प्राप्त होत असल्याने याची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष लेखा परीक्षण पडताळणी समिती स्थापन केली आहे.
                  याविषयी अधिक प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने आयुक्त अभिजीत बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील कोव्हीड 19 उपचार करणा-या सर्व रूग्णालयांमध्ये जाऊन देयकांची पडताळणी करण्याकरिता 6 विशेष लेखा परीक्षण पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकांमार्फत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोव्हीड रूग्णालयांमधील कोव्हीड 19 चा प्रसार सुरू झाल्यापासूनच्या कालावधीतील देयकांची पडताळणी केली जात आहे.या पथकांमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांची अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उपआयुक्त राजेश कानडे यांच्या समवेत विशेष आढावा बैठक घेत आयुक्त अभिजीत बांगर यांनी पथकांना कालबध्द पध्दतीने विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले व देयक तपासणीच्या त्यांच्या कार्यपध्दतीची माहिती घेऊन त्यामध्ये सुधारणा सूचित केल्या.कोव्हीड रूग्णांवर खाजगी रूग्णालयांमार्फत शासनाने निश्चित केलेल्या दरांमध्येच योग्य उपचार केले जावेत व त्यामध्ये रूग्णाची कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक व्हायला नको हा उद्देश स्पष्ट करीत सर्व रूग्णालयांकडून तशा प्रकारचे बंधपत्र लिहून घ्यावे असे आयुक्तांनी सूचित केले. या लेखा परीक्षण समितीचा उद्देश देयकांमध्ये आकारण्यात आलेल्या विविध बाबींची दर पडताळणी हा असून त्यानुसार काम करून दर आठवड्याला पथकनिहाय तपशील आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.पथकांना आत्तापर्यंत देयके तपासणी करताना आलेल्या अनुभवांची सविस्तर माहिती घेत आयुक्तांनी त्यामधील सुधारणांविषयी मार्गदर्शन केले व देयके तपासणी करताना वस्तुनिष्ठ काम होईल याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले.खाजगी रूग्णालयांमधील कोव्हीड 19 विषयक उपचारांच्या देयकांबाबत नागरिकांना तक्रार दाखल करणे सोयीचे व्हावे याकरिता "कोव्हीड 19 बिल तक्रार निवारण केंद्र (Covid Bill Complaint Centre)" कार्यान्वित करण्यात आला असून त्यासाठी 022-27567389 हा हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांक तसेच 7208490010 हा व्हॉट्स ॲप  क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.खाजगी रूग्णालयात उपचार करताना ते शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच होणे आवश्यक आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होऊ नये याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सतर्क आहे. तरी नागरिकांनी खाजगी रूग्णालयातील कोव्हीड 19 उपचारांच्या देयकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास ती महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर करावी असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.  .


Popular posts
मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘पोलीस तिथं पुस्तक’ नवी मुंबई मनसेचा उपक्रम, सात पोलिस स्टेशनला पुस्तक लायब्ररीच वाटप
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
विद्यार्थी व पालकांच्या समस्येसाठी नवी मुंबई स्टुडंट्स अँड युथ फाऊंडेशनचा पुढाकार 
नाशिककरांचे नाशिक स्मार्ट सिटी होण्याचे स्वप्न अधुरेच , सात वर्षात खर्च ७००, कोटीच्या वर पण अजूनही कामे प्रलंबितच
Image
गणपती विसर्जन तराफावर बसून तलावात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू