नवी मुंबई - शुक्रवारी नाल्यातून वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह रविवारी दुपारी जुईनगर जवळील नाल्यात आढळून आला.दोन दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी दिली.या प्रकरणाची नेरुळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अनिकेत दिलीप कुमार सिंग (७) असे मयत मुलाचे नाव आहे.तो शिरवणे गावात राहणार असून त्याच्या मृत्यूने गावात खळबळ माजली आहे. शुक्रवारी दुपारी वादळी पावसाला सुरवात झाली असता त्या पावसाच्या पाण्याने नाले तुडुंब भरून वाहू लागले.त्याच दरम्यान काही नाल्यांवरील झाकणे उघडी झाल्याने त्याचा फटका मयत अनिकेतला पडला.शुक्रवारी दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर अनिकेत घराबाहेर आला.त्याचवेळी तो नाल्यावरून चालत असतांना अचानक त्याचा तोल गेला आणि तो नाल्यात बुडाला.नाल्यातील पाण्याचा प्रवाह तेज असल्याने तो काही क्षणातच वाहून गेला.याची कुणकुण पोलीस ,अग्निशनम दलाला लागताच त्यांनी अनिकेतचा शोध घेण्यास सुरवात केली.मात्र तो सापडला नाही.त्यानंतर पुन्हा शनिवारी पोलिसांनी त्याचा शोध घेतला तरीही तो सापडला नाही.अखेर रविवारी दुपारी अनिकेतचा मृतदेह नाल्याजवळ आढळून आला.त्यावेळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला.सदर माहिती मिळताच सिंग परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला.
नाल्यातून वाहून गेलेल्या मुलाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला