मुंबई - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाय योजना केली होती. शासनाच्या आदेशाप्रमाणे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये महावितरणला ग्राहकाकडे जाऊन प्रत्यक्ष मीटरचे रीडिंग घेण्याची परवानगी नसल्यामुळे, महावितरणला ग्राहकांचे मीटर रीडिंग घेता आले नाही. मीटर रिडींग प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यानंतर महावितरणने संगणीकृत प्रणालीमधून वीजग्राहकांना अचूक वीजबिले पाठवली. ग्राहकांना वेबिनार, ग्राहक मेळावा व इतर पद्धतीने त्यांच्या वीजबिलाबाबत माहिती समजावून सांगितली. या कार्यक्रमांना प्रतिसाद देऊन काही ग्राहकांनी लॉकडाऊन कालावधीतील वीज बिल भरले. परंतु, अजूनही काही ग्राहकांनी एप्रिल महिन्यापासून बिल भरले नाहीत. परिणामी, महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत ९,४१,०४६ उच्चदाब व लघुदाब ग्राहकांनी एकूण ५७२ कोटीचे (उच्चदाब ९८ कोटी व लघुदाब ४७३ कोटी) वीजबिल भरले नाहीत. महावितरण भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व वीज ग्राहकांना आपले थकीत वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करण्यास आवाहन केले आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये एप्रिल व मे महिन्यात तसेच काही ठिकाणी जुन महिन्यात सुद्धा सरासरी वीजवापरानुसार वीजबिल देण्यात आले. शासनाच्या परवानगीनंतर जुलै महिन्यात मीटर रीडींग घेऊन प्रत्यक्ष वीजवापरानुसार एप्रिल व मे महिन्यासह जून महिन्याचे एकत्रित वीजबिल ग्राहकांना देण्यात आले. तीन महिन्याचे एकत्रित बिल आल्यामुळे वीज बिलाबाबत ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाले. महावितरणने विविध माध्यमातून तसेच प्रत्यक्ष ग्राहकांना भेटून वीजबिल अचूक असल्याबद्दल माहिती दिली. महावितरणने लॉकडाऊनच्या काळात आपल्या जीवाची काळजी न करता वीज ग्राहकांना उत्तम व अखंडित वीजपुरवठा केला. लॉकडाऊन मध्ये सर्व जण घरातून काम करत होते. त्यांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणचे कर्मचारी व अधिकारी तत्परतेने काम करत होते. महावितरणला ग्राहकांच्या मांगणी प्रमाणे अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी महानिर्मिती तसेच इतर विविध स्रोताकडून वीज खरेदी करावी लागते. वीज खरेदीसाठी लागणारे पैसे तसेच इतर महत्वाची देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी लागणारे पैसे महावितरणला उपलब्ध करणे कठीण झाले आहे. महावितरणची आर्थिक स्थिती बिकट असून ग्राहकांकडे असलेली थकबाकी स्वतःहून भरणे गरजेचे आहे. परंतु वीज ग्राहकांकडून नियमित वीज बिलांचा भरणा होत नसल्यामुळे माहे एप्रिल पासून भांडूप परिमंडल अंतर्गत असलेल्या ग्राहकांची थकबाकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
महावितरणच्या भांडूप परिमंडल अंतर्गत उच्च व लघुदाब ग्राहकांची एप्रिल २०२० ते ऑक्टोबर
२०२० पर्यंतची थकबाकी खालील प्रमाणे आहे:
वर्गवारी ग्राहक थकबाकी (कोटी)
घरगुती ७७५७९६ २९१.३७
वाणिज्य १३०९७० १३४.०५
औद्योगिक ११७०२ ९०.९८
कृषी १०७७५ १.८९
पथदिवे ३६४८ ३०.८०
पाणीपुरवठा योजना २०३७ ५.७६
सार्वजनिक सेवा ४८८८ १४.७३
इतर १२३० २.८२
एकूण ९,४१,०४६ ५७२.४
वीज ग्राहकांना थकबाकीची रक्कम भरणे सोयीस्कर व्हावे म्हणून महावितरणने नवीन धोरण आणले असून त्याप्रमाणे थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांना ३०% वीजबिल भरून उर्वरित थकबाकी ३ हफ्त्यात भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. या धोरणानुसार थकीत वीज बिल असलेले ग्राहक, थकबाकीमुळे ज्या ग्राहकांची वीज जोडणी तात्पुरता/ कायमस्वरूपी खंडित केलेली आहे, ज्यांचा न्यायालयातर्फे हुकूमनामा पारित झालेला आहे, तसेच ज्या ग्राहकांचा वीज देयकांबाबत महावितरण विरुद्ध दावे प्रलंबित आहेत, इत्यादी ग्राहकासाठी देखील वीजबिल भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्यास सवलती दिलेल्या आहेत. या धोरणाचा लाभ वीज ग्राहकांना एकदाच घेता येणार आहे. भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सर्व ग्राहकांना या नवीन धोरणाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे तसेच ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी वीज बिल भरणा करणे अत्यंत आवश्यक असून सर्व वीज बिल भरून सहकार्य करावे.