नवी मुंबई - शेअर मार्केटच्या नावाखाली ऑनलाईन जुगाराचा व्यवसाय चालवणाऱ्या संभाजी पाटील या मुख्य सूत्रधाराला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.त्याचा वारंवार जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर अखेर त्याची मंगळवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.याच प्रकरणात यापूर्वी चौघांना अटक करण्यात आली होती.त्यांच्यावरही गुन्हे दाखल असून अखेर यातील मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.संभाजी पाटील हा गावावरून तरुणांना नोकरीच्या बहाण्याने नवी मुंबईत आणून त्यांच्याकडून ऑनलाईन जुगाराचे काम करून घेत होता.त्याच मुलांमधील एक मुलगा गेल्या चार वर्षांपासून बेपत्ता असून त्याचा अद्याप शोध लागलेला नाही.
सीबीडी येथे ऑनलाइन जुगार सुरु असल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी छापा टाकून नवी मुंबई पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे.या प्रकरणातील मुख्य आरोपी संभाजी पाटील फरार झाल्यानंतर त्याने न्यायालयाच्या माध्यमातूम जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला.मात्र तो फेटाळून लावण्यात आल्यानंतर अखेर शुक्रवारी सायंकाळी संभाजी पाटील याला अटक करण्यात आली.मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता अखेर न्यायालयाने पाटील याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.जुगाराचा सूत्रधार संभाजी पाटील याने शेअर मार्केटमध्ये नोकरीच्या बहाण्याने या तरुणांना सांगलीसह विविध भागातून आणून नवी मुंबईत वेगवेगळ्या जुगाराच्या अड्ड्यावर जुंपले होते.त्यापैकी अनेकांना कित्येक वर्षांपासून पगारदेखील देण्यात आलेला नाही.अनेक महिने पगार थकीत ठेवल्यानंतर पाच ते दहा हजार रुपये देऊन कामगारांना देऊन त्यांची कोंडी करून ठेवायचा. त्याच्या या त्रासाला कंटाळून यापूर्वी काहींनी नोकरी सोडून पळदेखील काढला होता. त्यापैकी कित्येकांचे तीन ते पाच वर्षांचे वेतनदेखील संभाजी याने दिलेले नाही.त्याच दरम्यान सत्यवान पाणिरे (३०) हा तरुण २०१७ पासून बेपत्ता असून त्याचा कोणताही शोध लागलेला नाही, दहा वर्षे काम करूनही त्याला पगार देण्यात आला नव्हता. त्यामुळे अचानक तो बेपत्ता होण्यामागे घातपाताचे कारण आहे का असा प्रश्न सत्यवान पाणिरे चे मोठे बंधू सुखदेव पाणिरे यांनी उपस्थित केला आहे.