नवी मुंबई : गेल्या वर्षभरापासून राज्यात कोरोनाचा कहर सुरु असून तो अजूनही आटोक्यात येत नसल्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ सरकारवर आली आहे.कश्याही प्रकारे कोरोना आटोक्यात यावा म्हणून राज्य सरकार अथक प्रयत्न करत असून त्यासाठी संपूर्ण प्रशाकीय यंत्रणा जुंपली आहे.त्यातच स्वच्छ भारत अभियान आल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांची तर तारांबळच उडाली.याचाच फायदा घेत भूमाफियांनी अनधिकृत बांधकामांना सुरवात केल्याने आजमितीस नवी मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात त्याचा सुळसुळाट सुटला आहे.याला कुठेतरी आळा बसावा व अनधिकृत बांधकामावर कारवाई व्हावी यासाठी लवकरच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांची भेट घेणार असल्याचे राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश महाजन यांनी स्पष्ट केले आहे.
तत्कालीन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात अनेक बेकायदा बांधकामावर हातोडा पडला असता त्याच बांधकामावर आता नव्याने पुन्हा बांधकामे होऊ लागली आहेत.तर काही ठिकाणी बांधकामेही झाली असून त्यावर दुकानदार व रहिवाश्यांनी आपले बस्तान मांडले आहेत.भविष्यात जर पुन्हा तुकाराम मुंडे यांची अथवा त्यांच्यासारखा सक्षम आयुक्त नवी मुंबईला लाभला तर पुन्हा हजारो कारवाईचा धडाका लागू शकतो.त्यामुळे भविष्यात एखाद्याचे नुकसान होण्यापेक्षा आताच त्यावर नियंत्रण मिळवणे गरजेचे असल्याचे योगेश महाजन यांनी सांगितले.यासाठी लवकरच नवी मुंबई शहरातील होऊ घातलेल्या बेकायदा बांधकाम धारकांची यादी नाव व पत्यासह राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,प्रवीण दरेकर, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर याना देणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून नवी मुंबईत मात्र भाजप नेते गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे.त्यामुळे सत्ताधारी व विरोधक अश्या दोन्ही नेत्यांना कारवाई व सामान्य नागरिकांच्या हितासाठी निवेदन लवकरच सादर करण्यात येईल असे महाजन यांनी स्पष्ट केले आहे.सध्या स्थितीत भूमाफिया कायदा धाब्यावर बसवुन मोठ्या जोशात बांधकामे करत आहेत.त्याकडे काही प्रमाणात स्थानिक अधिकारी कानाडोळा करत असल्याने यात त्यांचाही सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.यात सर्वांचीच चौकशी होणे गरजेचे असल्याचे मत राजे प्रतिष्ठान सुरक्षा रक्षक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष योगेश महाजन यांनी व्यक्त केले आहे.