थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% सूट देणारी अभय योजना, एक ऑक्टोबरपासून सुरुवात

नवी मुंबई :- महानगरपालिकेच्या वतीने थकीत मालमत्ताकर धारकांना थकीत कर भरण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी जप्तीची कारवाई करण्यात येत असून त्याचवेळी थकीत करामधील दंडात्मक रक्कमेतून सूट दिल्यास थकीत करभरणा करणे अधिक सोयीचे ठरेल हा दृष्टीकोन नजरेसमोर ठेवून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी यापूर्वीच जाहीर केलेली 2 महिन्यांची थकीत मालमत्ताकर अभय योजना उद्या 1 ऑक्टोबर 2021 पासून सुरु होत आहे. यामध्ये थकीत मालमत्ताकराच्या दंडात्मक रक्कमेवर 75 टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्याने थकबाकीदार मालमत्ताकर धारकांसाठी हा मोठा आर्थिक दिलासा आहे.

                 महानगरपालिकेच्या उत्पन्नामध्ये मालमत्ताकर हा एक प्रमुख स्त्रोत असून याव्दारे जमा होणा-या महसूलामधूनच नागरिकांकरिता विविध सेवासुविधांची दर्जेदार परिपूर्ती करण्यात येत असते. कोव्हीड कालावधीत लॉकडाऊन व इतर कारणांमुळे थकबाकीसह मालमत्ताकर भरणा करण्यात नागरिकांना भेडसावणा-या अडचणी लक्षात घेऊन आयुक्तांनी 1 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2021 या दोन महिन्यांच्या कालावधीत 'मालमत्ताकर अभय योजना 2021-22' जाहीर करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे.30 सप्टेंबर 2021 पर्यंतच्या थकीत मालमत्ता कराच्या दंडात्मक रक्कमेवर 75% इतकी भरीव सूट देणारी ही थकबाकीदारांसाठी अत्यंत लाभदायी योजना असून योजनेमध्ये जाहीर केलेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत थकबाकीदार नागरिकांनी मालमत्ता कराची संपूर्ण थकीत रक्कम अधिक केवळ 25% दंडात्मक रक्कम भरणा केल्यास त्यांची 75% दंडात्मक रक्कम माफ होणार आहे.

या अभय योजनेचा लाभ घेताना दंडात्मक रक्कमेतून 75 टक्के सूट वजा केल्यानंतर किती रक्कम भरावयाची आहे याची माहिती महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in या वेबसाईटवर सहज उपलब्ध असून सदर रक्कमेचा भरणा ऑनलाईन पध्दतीने महानगरपालिकेच्या वेबसाईटवर तसेच NMMC e-connect या मोबाईल ॲपव्दारे अभय योजनेच्या विशेष लिंकवर करता येणार आहे. रक्कम ऑनलाईन भरणा करण्यासाठी डेबिट कार्ड / क्रेडिट कार्ड / इंटरनेट बँकींग / एनईएफटी / आरटीजीएस या सुविधांचा उपयोग नागरिकांना करता येईल.रक्कम भरणा करण्यासाठी मालमत्ताकर थकबाकीदारांना महानगरपालिकेच्या कोणत्याही कार्यालयात जाण्याची गरज असणार नाही तसेच सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध असल्याने थकबाकीविषयी कोणत्याही प्रकारची माहिती घेण्यास कोणासही संपर्क साधण्याची गरज राहणार नाही. मालमत्ताकर विभागाच्या कार्यप्रणालीमध्ये पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेने "झिरो पब्लिक कॉन्टॅक्ट" या तत्वावर विविध बाबींमध्ये सुधारणा करण्यास सुरुवात केली असून त्याचाच एक भाग म्हणून करदात्यांना अत्यंत सुलभ पध्दतीने थकीत कराचा भरणा करणे शक्य व्हावे अशा पध्दतीने अभय योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.ही रक्कम थकबाकीदारांनी एकाचवेळी भरणा करावयाची असून ती टप्प्याटप्प्याने भरता येणार नाही याची नोंद घ्यावयाची आहे. त्याचप्रमाणे जाहीर केलेल्या अभय योजनेच्या कालावधीमध्येही कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही याचीही दखल घेऊन 30 नोव्हेंबरपर्यंत न थांबता नागरिकांनी त्वरित आपल्या मालमत्ताकराची थकीत रक्कम व त्यावर केवळ 25 टक्के दंडात्मक रक्कम भरणा करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिका आयुक्त  अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Popular posts
पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image
एमआयडीसी प्रशासनाविरोधात प्रकल्पग्रस्त वृद्ध महिलेचे सोमवारपासून उपोषण, प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी, भूखंड घोटाळ्याप्रकरणी साष्टे परिवार आक्रमक,न्याय मिळेपर्यत सुरु ठेवणार आंदोलन
Image