कारवाई नंतर अनधिकृत बांधकाम पुन्हा सुरू केल्यास आयपीसी कलमाव्दारे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

नवी मुंबई :- अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामामुळे शहर नियोजनाला बाधा पोहचत असून या बांधकामांमुळे नागरी सुविधांवरही ताण पडतो. त्यामुळे तक्रार आल्यानंतर कारवाई करण्याची वाट न पाहता आपल्या विभागामध्ये स्वत:हून अनधिकृत बांधकामे रोखण्यासाठी पुढाकार घेण्याचे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिक्रमण विभागाच्या आढावा बैठकीप्रसंगी दिले.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, अतिक्रमण विभागाचे उप आयुक्त अमरिश पटनिगिरे तसेच सर्व विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व अतिक्रमण विभागाचे सर्व विभागातील अभियंते उपस्थित होते.

                   महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये सध्या सुरु असलेल्या बांधकामांना बजाविलेल्या नोटिसांचा विभागनिहाय आढावा घेताना आयुक्तांनी एकदा नोटीस देऊन बांधकाम निष्कासीत केल्यावर एफआयआर दाखल होऊनही जर पुन्हा बांधकाम केले जात असेल तर ते गंभीरतेने घेऊन आयपीसी कलमाव्दारे गुन्हा दाखल करावा असे निर्देश दिले. कायद्याला न जुमानता अशाप्रकारे एकदा कारवाई करूनही पुन्हा व्यवस्थेला गृहीत धरून दुस-यांदा नियमांचा भंग केल्याचा आढळल्यास ही बाब गंभीरतेने घेऊन अशा बांधकाम धारकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात यावी व ती पोलीस आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.नोटीसीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर करण्यात येणा-या बांधकाम निष्कासनाची कारवाई करतानाचे छायाचित्रण करून संगणक विभागाच्या सहकार्याने एक वेब ॲप्लिकेशन तयार करण्यात यावे व आढावा बैठकीप्रसंगी या कारवाईचे सादरीकरण करण्यात यावे असे आयुक्तांनी निर्देशित केले.अनधिकृत इमारतीची माहिती नागरिकांपर्यंत पोहचण्यासाठी अशा इमारतींसमोर प्रसिध्द करण्यात आलेले फलक काढून टाकले जातात ही बाब गंभीरपणे घेण्यासारखी असून याबाबत ठोस कारवाई करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. विभाग कार्यालयात अतिक्रमण विभागासाठी नियुक्त अभियंते संबंधित विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असून आपापल्या विभागातील अतिक्रमणे व अनधिकृत बांधकामे यांची संपूर्ण जबाबदारी विभाग अधिकारी यांची आहे असे आयुक्तांनी स्पष्ट केले. फेरीवाल्यांचा उपद्रव नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर प्राप्त होत असून हे नवी मुंबई सारख्या शहराला साजेसे नसून रहदारीला व वाहतुकीला अडथळा पोहचविणा-या फेरीवाल्यांविरोधातील कारवाया अधिक तीव्र स्वरुपात राबवाव्यात असेही आयुक्तांनी सूचित केले.नवी मुंबईचा सुनियोजित हा नावलौकीक कायम राखण्याची सर्वात मोठी जबाबदारी अतिक्रमण विभागाची व क्षेत्रीय पातळीवर विभाग अधिकारी यांची असून त्यादृष्टीने सतत जागरुक रहावे असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

Popular posts
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image