नवी मुंबई :- 'स्वच्छ सर्वेक्षण 2021' मध्ये देशातील मोठ्या शहरांमध्ये प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान लाभलेले नवी मुंबई शहर सतत नवनवीन संकल्पना राबविण्यात आघाडीवर राहिले आहे. याच धर्तीवर 'स्वच्छ सर्वेक्षण 2022' ला सामोरे जाताना शहर स्वच्छतेत प्राण्यांचाही विचार करीत 'पेट कॉर्नर' सारखी महत्वाची आणि उपयोगी अशी आगळीवेगळी संकल्पना राबवून नवी मुंबई देशातील नंबर वन स्वच्छ शहराच्या लौकीकात अधिकाधिक भर घालत असल्याबद्दल 'स्वच्छ नवी मुंबई मिशन'चे ब्रँड ॲम्बेसेडर तथा सुप्रसिध्द संगीतकार - गायक शंकर महादेवन यांनी अभिनंदन केले. देशातील पहिल्या पेट कॉर्नरचे लोकार्पण करण्याचा बहुमान आपल्याला मिळाला याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आपल्या दोन पाळीव कुत्र्यांनाही सोबत आणले होते.
सेक्टर 29, वाशी
येथे शिवपूजा आणि ओम शिव पार्वती सोसायटी मागील हरितपट्ट्याच्या ठिकाणी नवी मुंबई
महानगरपालिकेच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या 'पेट
कॉर्नर'
या आगळ्यावेगळ्या स्वच्छता संकल्पनेच्या लोकार्पण
समारंभप्रसंगी 'स्वच्छ
नवी मुंबई मिशन'चे
ब्रँड ॲम्बेसेडर तथा सुप्रसिध्द संगीतकार - गायक शंकर महादेवन आपले मनोगत व्यक्त
करीत होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त
आयुक्त सुजाता ढोले,
प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा
व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तथा स्वच्छ भारत मिशनचे नोडल अधिकारी डॉ. बाबासाहेब
राजळे,
शहर अभियंता संजय देसाई, कार्यकारी
अभियंता अरविंद शिंदे, वाशी विभाग अधिकारी सुखदेव येडवे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.मी स्वत: पाळीव
प्राण्यांचा चाहता असल्याचे सांगत या पेट कॉर्नरच्या माध्यमातून नवी मुंबई
महानगरपालिका माणसांप्रमाणेच प्राण्यांचीही काळजी घेत असून यातून प्राण्यांविषयी
प्रेम दिसून येते अशी भावना शंकर महादेवन यांनी व्यक्त केली. प्रत्येक गोष्ट
नाविन्यपूर्ण पध्दतीने करणे ही नवी
मुंबईची खासियत असून पेट कॉर्नरसारखी अभिनव संकल्पना देशात पहिल्यांदा आपल्या नवी
मुंबई शहरात राबविली जात असल्याचा अभिमान वाटतो असे सांगत इतर शहरांनी अनुकरण
करावे अशी ही संकल्पना असल्याचे ते म्हणाले.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना
महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहर स्वच्छतेमध्ये देशात सर्वोत्तम स्थान
प्राप्त केल्यानंतर त्यामध्ये नवनव्या संकल्पना राबवून विकासात्मक सुधारणा
करण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच लक्ष दिले आहे. 'स्वच्छ
सर्वेक्षण 2021'
मध्ये ओडिएफ कॅटॅगरीमध्ये 'वॉटरप्लस' हे
सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले असून त्यापुढे वाटचाल करताना माणसांप्रमाणेच
प्राण्यांचाही विचार करीत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 'पेट
कॉ़र्नर'
ही अभिनव संकल्पना राबविली जात असल्याचे त्यांनी सांगितले.पाळीव
प्राण्यांना शौचासाठी सार्वजनिक ठिकाणी घेऊन येणाऱ्या नागरिकांनी शहर स्वच्छतेच्या
दृष्टीने त्यांच्या विष्ठेची स्वत: विल्हेवाट लावणे आवश्यक आहे. तसे न केल्यास
त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येते. एका बाजूने त्यांच्यावर दंडात्मक
कारवाई करताना त्यांना त्यासाठी पर्यायी योग्य व्यवस्था उपलब्ध करुन देणे गरजेचे
असल्याचे लक्षात घेत पेट कॉर्नर ही अभिनव संकल्पना नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत
राबविण्याचे निश्चित करण्यात आले व आज पहिला पेट कॉर्नर नवी मुंबईचा गौरव असलेल्या
शंकर महादेवन यांच्या शुभहस्ते लोकार्पण होत आहे याचा आनंद आयुक्तांनी व्यक्त
केला. अशाप्रकारे सर्व विभागांमध्ये पहिल्या टप्प्यात 18
पेट कॉर्नर निर्माण करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.सेक्टर 29
वाशी येथील नाल्याशेजारील हरीत पट्टयाच्या बाजूला 10 x 12
फूट आकाराच्या खोलगट जागेत वाळू टाकून त्या ठिकाणी पेट कॉर्नरची निर्मिती करण्यात
आलेली आहे. त्या परिसरातील नागरिकांनी आपल्या घरातील पाळीव प्राण्यांना शौचासाठी
या पेट कॉर्नरच्या वाळू टाकलेल्या ठिकाणी घेऊन येणे अपेक्षित आहे. पेट कॉर्नरच्या
ठिकाणी प्राण्यांची विष्ठा उचलण्यासाठी आधुनिक प्रकारचे स्कूप ठेवलेले असून
स्कूपने उचलेली विष्ठा टाकण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांचीही व्यवस्था करण्यात आलेली
आहे. या प्लास्टिक पिशव्या तेथे ठेवलेल्या कचरापेटीमध्ये टाकावयाच्या असून
कचरापेट्या नियमित स्वच्छ करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. याव्दारे शहरातील
रस्ते व सार्वजनिक ठिकाणच्या अस्वच्छतेस प्रतिबंध होणार आहे.माझ्या घरातील पाळीव
प्राण्यांसाठी मी या पेट कॉर्नरचा उपयोग करणार असून प्राणीप्रेमी सर्व
नागरिकांनीही घरातील पाळीव प्राण्यांसाठी आपापल्या भागात निर्माण केल्या जाणाऱ्या
पेट कॉर्नरचा उपयोग करावा व आपल्या नवी मुंबई शहराच्या नंबर वन स्वच्छतेत सक्रिय
योगदान दयावे असे आवाहन 'स्वच्छ नवी मुंबई मिशन'चे
ब्रँड ॲम्बेसेडर तथा सुप्रसिध्द संगीतकार - गायक शंकर महादेवन यांनी केले आहे.