ढोल वाजवत मनसेचा कामगारांसाठी नवी मुंबई मनपावर विराट मोर्चा , कोविडमुळे मृत मनपा कामगारांचे नातेवाईकही मोर्चात सहभागी

ढोल वाजवत मनसेचा कामगारांसाठी नवी मुंबई मनपावर विराट मोर्चा

कोविडमुळे मृत मनपा कामगारांचे नातेवाईकही मोर्चात सहभागी

नवी मुंबई मनपा कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ११ मार्च रोजी मनसे मनपा कामगार कर्मचारी सेने तर्फे मनपा मुख्यालयावर हजारोंच्या संख्येने "ढोल वाजवा" आंदोलन करण्यात आले. मनसे मनपा कामगार कर्मचारी सेनेचे राज्य अध्यक्ष व मनसे सरचिटणीस, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली हा धडक मोर्चा मनसे मध्यवर्ती कार्यालय, सीवूड्स ते मनपा मुख्यालय असा हजारो कामगारांच्या सहभागाने झाला. यावेळी कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या मनपा कंत्राटी कामगारांचे कुटुंबीय मोर्चात सहभागी झाले होते. या आंदोलनाची सुरुवात कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्या मनपा कंत्राटी कामगारांना श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली. यानंतर मनसेचा हा मोर्चा  पायी मनसे मध्यवर्ती कार्यालय ते मनपा मुख्यालया पर्यंत ढोल वाजवत व मनपा प्रशासना  विरोधात घोषणा देत पोचला. यावेळी "मयत कामगारांच्या हक्काचा विमा.....मिळालाच पाहिजे...मिळालाच पाहिजे...!”, “कोविड भत्ता आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा..!!”, “आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा..!!”, “समान कामाला समान वेतन, मिळालेच पाहिजे....मिळालेच पाहिजे...!!”, “नवी मुंबई मनपा प्रशासनाचं करायचं काय?...खाली डोकं वरती पाय...”, या घोषणा देत मनपा कंत्राटी कामगारांनी परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या कुटुंबीयांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व असंवेदनशील मनपा प्रशासनाचा निषेध केला. 

मनसे युनियन ने 'कायम' कामगारांप्रमाणे, कंत्राटी कामगारांना देखील "समान काम समान वेतन" लागू करण्यासाठी ९ एप्रिल २०२१ रोजी सर्वप्रथम मागणी केली. त्यावर अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली, परंतु त्यात एकाही कामगार संघटनेच्या प्रतिनिधीला समाविष्ट करण्यात आले नाही. यामध्ये कोणताही धोरणात्मक निर्णय न घेता, हा निव्वळ वेळ काढूपणा करण्याचे काम पालिका प्रशासनामार्फत चालू आहे. तसेच कोरोना मुळे मृत्यू झालेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना २८ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर "क" वर्ग महापालिकेतील कामगारांसाठी ५० लाख रुपये व नवी मुंबई महापालिकेने मंजूर केलेले ५ लाख रुपये अद्यापही देण्यात आलेले नाहीत किंवा त्याबाबतचा प्रस्तावही मनपाने शासनाकडे पाठवलेला नाही. यावरून आपल्या मृत्यू पावलेल्या कंत्राटी कामगारांबाबत महापालिका प्रशासन किती असंवेदनशील आहे हे दिसून येते. कोरोना काळामध्ये कर्तव्य बजावणाऱ्या मनपा कंत्राटी कामगारांना २३ मार्च २०२० ते ३१ मे २०२० या कालावधीमध्ये कोरोना भत्ता प्रतिदिन ३०० रुपये मिळावा अशी मागणी केली असताना देखील एका बाजूला कायम कामगारांना हा भत्ता देण्यात आला आहे मात्र कंत्राटी कामगारांच्या बाबतीत हा दूजाभाव आयुक्त करत असल्याचा आरोप मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी याप्रसंगी केला आहे.या मागण्यांबद्दल नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे वारंवार निवेदने करूनही प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजवाणी होत नसल्यामुळे आज मनसेने हे "ढोल वाजवा" आंदोलन करून धडक मोर्चा काढल्याचे मनसे युनियनचे शहर अध्यक्ष अप्पासाहेब कोठुळे यांनी म्हटले आहे.मनसेचा मोर्चा मनपा मुख्यालयापर्यंत पोहोचल्यानंतर, मनसेच्या शिष्टमंडळाने आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. यावेळी आयुक्तांनी मनसेच्या मागण्या मान्य करत कोविडमुळे मृत 13 कंत्राटी कामगारांच्या कुटुंबियांना येत्या दोन ते पंधरा दिवसांत महापालिकेतर्फे ५ लाख रुपये भरपाई देण्याचे मान्य केले. तसेच राज्य शासनाला देखील या मृत कामगारांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यासाठी तात्काळ अहवाल पाठवणार असल्याचे आयुक्त अभिजित बांगर यांनी मनसेच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले. “समान काम समान वेतन" या मनसेच्या मागणीबाबत अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीत कामगारांचे प्रतिनिधी देखील घेतले जातील असे आश्वासन आयुक्त अभिजित बांगर यांनी याप्रसंगी मनसेच्या शिष्ट मंडळास दिले. कोविड काळात मंजूर झालेले ३०० रुपये प्रतिदिन भत्ता याबाबत मनसे लढा सुरु ठेवणार असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.जर या मोर्चा नंतर देखील मनपा प्रशासनाला जाग आली नाही, तर कोरोना मुळे मृत पावलेल्या कंत्राटी कामगारांच्या कुटुंबीयांसमवेत आयुक्त अभिजित बांगर यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करण्याचा थेट इशारा मनसे सरचिटणीस, प्रवक्ते व मनपा कामगार सेना अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी याप्रसंगी दिला.या "ढोल वाजवा" आंदोलनात मनसे मनपा कामगार कर्मचारी सेनेचे राज्य अध्यक्ष व मनसे सरचिटणीस, प्रवक्ते संदीप देशपांडे, मनसे मनपा कामगार सेना कार्याध्यक्ष संतोष धुरी, मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे, मनसे नवी मुंबई मनपा कामगार कर्मचारी सेनेचे शहर अध्यक्ष आप्पासाहेब कोठूळे, कार्याध्यक्ष अमोल आयवळे, सरचिटणीस अभिजित देसाई, उपाध्यक्ष रुपेश कदम, चिटणीस अशोक पाटील, सहचिटणीस रणजित सुतार ,विजय राठोड, मनसे विधी सेनेचे सरचिटणीस एड.अक्षय काशीद, मनसे महिला सेनेच्या डॉ .आरती धुमाळ, यशोदा खेडस्कर , मनसे शहर सचिव सचिन कदम, तसेच अमोल इंगोले, संदेश डोंगरे,  सागर नाईकरे, किरण सावंत, अनिकेत पाटील, सनप्रीत तुर्मेकर, अक्षय भोसले, चंद्रकांत मंजुळकर, भूषण कोळी, सागर विचारे, सुहास मिंडे, राजू खाडे, योगेश शेटे, युवराज मनसुख, विशाल चव्हाण, डॉ.स्वप्नील भागवत, अंकुश सानप, नितीन नाईकडे, नितीन नाईक, निलेश जाधव, प्रतिक खेडकर व हजारोंच्या संख्येने मनपा कामगार उपस्थित होते.

Popular posts
सिडकोच्या इमारत पुनर्बांधणी धोरणामध्ये महत्वपूर्ण बदल, १०० % ऐवजी केवळ ५१% सभासदांच्या संमतीने करता येणार इमारतींचा पुनर्बांधणी
Image
पोलीस असल्याचे सांगून बलात्कार करणाऱ्या तोतया पोलिसाला अटक
Image
८६ हजार वीज कर्मचारी,अभिंयते,अधिकारी व ४२००० कंत्राटी कामगार यांचा अदानी या खाजगी भांडवलदारांच्या विरोधात संपाची हाक , महाराष्ट्र राज्य वीज कामगार अभियंते अधिकारी संघर्ष समितीतर्फे संपाची हाक.
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
१६ वी रायन झोनल ऍथलेटिक मीट २०२३ पार , तरुण यशवंतांचा सत्कार करण्यासाठी विस्तृत पारितोषिक वितरण समारंभ आयोजित
Image