ऐरोलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे राष्ट्रीय स्मारक होईल - अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात

नवी मुंबई :- ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील ग्रंथालय, छायाचित्र संग्रहालय, ध्यानगृह अशा सर्वच सुविधा अप्रतिम असून हे स्मारक राष्ट्रीय स्मारक होईल असा विश्वास नामवंत अर्थतज्ज्ञ तथा विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केला.नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सेक्टर १५ ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये बाबासाहेबांच्या जयंती महोत्सवानिमित्त आयोजित 'जागर २०२२' कार्यक्रमातील पहिले व्याख्यानपुष्प अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात यांनी गुंफले. याप्रसंगी सभागृहात विविध क्षेत्रातील श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. स्मारकाबाहेर लावण्यात आलेल्या स्क्रीनवरूनही या व्याख्यानाच्या थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली होती, त्याचाही लाभ श्रोत्यांनी घेतला. 

      बाबासाहेबांनी राष्ट्र उभारणीचे फार मोठे काम केले असून न्याय, अर्थशास्त्र, जलनीती, ऊर्जा, महिला सक्षमीकरण, कामगार अशा विविध क्षेत्रांमधील त्यांच्या दूरदृष्टीच्या कार्याची विस्तृत माहिती देत डॉ. सुखदेव थोरात यांनी बाबासाहेबांना विशिष्ट समाजाच्या चौकटीत बध्द न करता ते राष्ट्रहित जपणारे सर्वव्यापी विचारांचे नेतृत्व होते हे अनेक उदाहरणे देत स्पष्ट केले.एका व्यक्तीने एवढ्या विविध क्षेत्रात इतके अतुलनीय कार्य केले असे दुसरे उदाहरण नाही हे विविध दाखले देत डॉ. सुखदेव थोरात यांनी स्पष्ट केले. बाबासाहेबांनी त्यावेळी केलेली भाकीते आज वर्तमानात त्यांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय घडवतात असे ते म्हणाले. समर्थ राष्ट्र उभारणीविषयीची त्यांची तळमळ त्यांच्या पुस्तकांमधून, लेखनामधून दिसून येते असे सांगत डॉ. थोरात यांनी देशाच्या आर्थिक विकासासाठीची विविध धोरणे बाबासाहेबांनी मांडली, ज्यामध्ये शेतीवर अवलंबून असणारा बोजा कमी करण्यासाठी औद्योगिकरणावर भर द्यावा हा त्यांनी १९१८ मध्ये मांडलेला आर्थिक विकासाचा सिध्दांत महत्वाचा असल्याचे ते म्हणाले.स्वातंत्र्यपूर्व काळात महत्वाच्या राष्ट्रीय विषयांवर उपाययोजना सुचविणे व पुढे स्वातंत्र्यानंतर मंत्री म्हणून अनेक लोकहिताय निर्णय घेणे या दोन्ही कालावधीत बाबासाहेब राष्ट्रहित जपत अग्रभागी होते. घटनेतून समानता प्रस्थापित करीत तत्कालीन अस्पृश्यतेला प्रतिबंध करण्याचे अत्यंत महत्वाचे काम डॉ. आंबेडकर यांनी केले असून मागासवर्गीयांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणे हे समानतेच्या दृष्टीने सर्वार्थाने राष्ट्र उभारणीचे काम असल्याचे मत डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.सर्वसमावेशक लोकशाहीची प्रेरणा हा बाबासाहेबांचा प्रामुख्याने दृष्टिकोन राहिला असून स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून प्रत्येक माणसाला मतदानाचा अधिकार असला पाहिजे ही बाबासाहेबांची आग्रही भूमिका राहिली. 'युनायटेड इंडिया' ही भूमिका बाबासाहेबांनी मांडली व घटना बनवितानाही एकात्मतेला महत्व देत व्यापक राष्ट्रहितच नजरेसमोर ठेवले. त्यामुळे घटना सादर झाली त्यावेळच्या समारंभातही घटना निर्मितीमध्ये बाबासाहेबांचा सर्वात महत्वाचा सहभाग असल्याचा विशेष उल्लेख करण्यात आला असे ते म्हणाले.स्वातंत्र्यपूर्व काळातल्या सरकारमध्ये १९४२ ते १९४६ या कालावधीत कामगारमंत्री म्हणून कामगार, सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा व जलसंधारण, ऊर्जा अशा महत्वाच्या विभागांचा कार्यभार सांभाळत असताना जल व ऊर्जेची विविध धोरणे बाबासाहेबांनी आणली, महिलांना समान अधिकार दिले, कामगारांसाठी कायदे केले असे विविध प्रकारचे समाजातील सर्व घटकांसाठी लाभदायी काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले असून त्यादृष्टीने त्यांच्या कार्याकडे पाहिले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे असा नवा विचार डॉ. सुखदेव थोरात यांनी मांडला.नवी मुंबई महानगरपालिकेने हे स्मारक उभारताना बाबासाहेबांच्या विचारांचे स्मारक व्हावे ही भूमिका जपली असून ती प्रशंसनीय असल्याचे सांगत अशाप्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवात विचारांचा जागर करण्याची संकल्पनाच अतिशय वेगळी असल्याचे मत डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी प्रास्ताविकपर मनोगतात महानगरपालिकेने उभारलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक हे ज्ञानकेंद्र म्हणून नावारुपाला यावे हा आमचा प्रयत्न असल्याचे सांगितले. त्यादृष्टीने येथील सुविधा निर्मितीमध्ये विशेषत्वाने येथील ग्रंथालय अधिकाधिक समृध्द होईल व अभ्यासक, संशोधकांना एका छताखाली बाबासाहेबांची व बाबासाहेबांविषयीची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध होईल यादृष्टीने कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांच्या जयंती उत्सवात वैचारिक जागर व्हावा ही महानगरपालिकेची भूमिका विषद करीत ही परंपरा यापुढील काळातही निरंतर सुरु राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.१४ एप्रिल या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपर्यंत 'जागर २०२२' अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून रविवार ३ एप्रिल रोजी, ७ वा. मुंबई विद्यापीठाचे लोककला विभागप्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे हे 'आंबेडकरी चळवळ आणि लोककला' या विषयावर सुसंवाद साधणार आहेत. त्यासोबतच ते लोकगीतांचे सादरीकरणही करणार आहेत. तरी नागरिकांनी वैचारिक जागर करण्यासाठी ऐरोली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक याठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 


Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image