नवी मुंबई :- वाढत्या अनधिकृत बांधकामांची लेखी तक्रार देऊनही त्यावर कारवाई करण्याऐवजी बांधकाम धारकांना अभय देण्याचे काम सुरु असल्याने नेरुळ विभाग कार्यालयाचे अतिक्रमण अधिकारी रितेश पुरव हे वसुली अधिकारी आहेत की प्रशासनाचे अतिक्रमण अधिकारी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.रितेश पुरव यांच्या हलगर्जीपणामुळे अनधिकृत बांधकाम धारकांना एक नवीन प्रेरणा मिळाल्याने आता नेरुळ विभाग कार्यालय हद्दीत शेकडोच्या वर अनधिकृत बांधकामे जोमात सुरु आहेत.काही काळजी करू नका,मी आहे तुमच्या पाठीशी,बिनधास्त अनधिकृत बांधकाम करा, जणू काही असा सल्लाच रितेश पुरव यांनी जाहीर केला असल्याचे चित्र सध्या नेरुळ विभाग कार्यालयात दिसून येत आहे.
नेरुळ विभाग कार्यालय हद्दीत नेरुळगाव,सारसोळे गाव, शिरवणे गाव यासह इतर विभाग असून प्रत्येक गावाच्या हद्दीत आजमितीस गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरु आहेत.अश्याच बांधकामांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत,मात्र त्यावर दिखाव्याच्या कारवाया करत त्यांना अभय देण्याचे काम सुरु आहे.शिरवणे गावात शहराचे माजी महापौर जयवंत सुतार याचं निवास स्थान असून त्या गावातही अनधिकृत बांधकामे जोमात सुरु आहेत.बांधकाम सुरु असतांनाच बांधकाम धारकांना नोटीस बजावण्यात येतात,मात्र कारवाया का होत नाही,याचे उत्तर मात्र गुलाबी गुलदस्त्यात आहे.सन २०२१-२२ मध्ये एकूण ५७ जणांना अनधिकृत बांधकाम सुरु असल्याप्रकरणी ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आल्यात.मात्र कारवाया कमी झाल्याने आजही त्यातील काही अनधिकृत बांधकामे जोमाने सुरु आहेत.काही दुकानदारांनी मार्जिनल स्पेस वापरून त्यावर कायमस्वरूपी बांधकाम केले असल्याचे निदर्शनास आणूनही त्यावरील कारवाई मात्र गुलाबी गुलदस्त्यात आहे.यावरून नेरुळ विभाग कार्यालयाचे अतिक्रमण अधिकारी रितेश पुरव हे वसुली अधिकारी आहेत की प्रशासनाचे अतिक्रमण अधिकारी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.नेरुळ विभाग कार्यालयाला खमक्या विभाग अधिकारी मिळत नसल्याने पुरव त्याचा पुरेपूर फायदा उचलत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.तर रितेश पूरव हे नवी मुंबई मनपा आयुक्त अभिजित बांगर यांच्या खास मर्जीतले अधिकारी असल्याने ते ठरवतील तीच पूर्व दिशा अशी स्थिती असल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.या सर्व प्रकारामुळे मात्र सामान्य नागरिकांना भविष्यात पाणी टंचाई,वीज टंचाई,वाहतुकीची अडचण याचा सामना करावा लागणार आहे.