नवी मुंबई :- मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे नवी मुंबई शहरात "सोसायटी तिथे पुस्तक" या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवी मुंबई शहरातील १०० गृह संकुलांना नामांकित लेखकांच्या दर्जेदार मराठी पुस्तकांचा संच देण्याचा संकल्प मनसेने केला आहे. आज रविवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी गृह संकुलांना पुस्तकं भेट देऊन या उपक्रमास सुरुवात करण्यात आली व उद्या दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी देखील अजून गृह संकुलांना पुस्तके भेट देणार असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
नवी मुंबई मनसेच्या "सोसायटी तिथे पुस्तक" या उपक्रमाची सुरुवात आज दिनांक २६ फेब्रुवारी रोजी जुईनगर येथील स्वामी सोसायटी इथून झाली. नवी मुंबई मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी स्वतः यावेळी उपस्थित राहून सोसायटीच्या सभासदांना मराठी पुस्तकांचा संच भेट दिला. त्याच बरोबर नवी मुंबईतील जुईनगर, वाशी, सीवूड्स, नेरुळ या विभागातील गुलमोहर सोसायटी, सप्तश्रृंगी सोसायटी,एन एल ४ असोसिएशन, गंगा जमुना सोसायटी, सिद्धी सोसायटी, निसर्ग सोसायटी, नव घरकुल सोसायटी, शिवसागर सोसायटी या ठिकाणी शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी उपस्थित राहून मराठी पुस्तकांचे संच भेट दिले. यावेळी गृह संकुलातील मानद सदस्य, महिला वर्ग, ज्येष्ठ नागरिक, तरुण व लहान मुलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. तसेच नवी मुंबईतील इतर गृह संकुलांना स्थानिक मनसे पदाधिकारी पुस्तकांचे संच भेट देणार असल्याचे मनसेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या उपक्रमाचे गृह संकुलातील सभासदांकडून स्वागत करण्यात आले. मराठी वाचन संस्कृती रुजावी व नव्या पिढीस वाचनाचे महत्व अधिरेखीत व्हावे यासाठी असे कौतुकास्पद उपक्रम वेळोवेळी राबिवण्यात यावेत अशी भावना गृह संकुल सभासदांनी व्यक्त केली.या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने आत्मकथा, प्रवास वर्णन, लहान मुलांची पुस्तकं, कादंबरी, स्पर्धा परीक्षांची पुस्तकं, पाककला यांचा समावेश आहे. आजच्या सोशल मिडीयाच्या जगात तरुणांमध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. आजच्या तरुण पिढीने "वाचाल तर वाचाल" या उक्तिला प्राधान्य देऊन वाचन संस्कृतीचे जतन करणे गरजेचे असल्याचे मनसे प्रवक्ते तथा नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. "सोसायटी तिथे ग्रंथालय" उपक्रमा मागे हाच मूळ उद्देश असल्याचे व नवी मुंबई शहरात वाचन संस्कृती रुजावी व तरुण व लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हा उपक्रम राबवत असल्याचे म्हटले आहे.याआधी देखील नवी मुंबई मनसे तर्फे कवी कुसुमाग्रजांच्या तसविरी वाचनालयांना भेट देणे, मराठी पुस्तके वाचनालयांना भेट देणे, मराठी शिक्षकांचा सत्कार करणे, पोस्ट कार्ड द्वारे शुभेच्छा पाठविणे व मागील वर्षीच राबिवण्यात आलेल्या अभिनव अशा "पोलीस तिथे पुस्तक" या उपक्रमाअंतर्गत नवी मुंबई शहरातील पोलीस स्टेशन्सना पुस्तकांचे कपाट व मराठी पुस्तकांचा संच भेट देणे असे अनेकानेक आगळेवेगळे उपक्रम राबिण्यात आले असल्याचे मनसेने म्हटले आहे.येत्या वर्षभरात नवी मुंबई शहरातील बहुतेक गृह संकुलांना टप्प्याटप्प्याने मराठी पुस्तके भेट देणार असल्याचे मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी म्हटले आहे. मनसेच्या या उपक्रमात याप्रसंगी शहर अध्यक्ष गजानन काळे, सचिव सचिन कदम, विभाग अध्यक्ष अमोल आयवळे, अक्षय भोसले, अभिलेश दंडवते, सुहास मिंडे, उमेश गायकवाड, सागर विचारे, अशोक भोसले, तसेच महिला सेनेच्या अनिथा नायडू, विद्यार्थी सेनेचे संदेश डोंगरे, सनप्रीत तुरमेकर, श्रीकांत माने, अनिकेत पाटील व मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.