जागृतेश्वर तलाव परिसर स्वच्छ करीत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ
नवी मुंबई :- स्वच्छता ही नियमित करण्याची गोष्ट असून स्वच्छतेमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. यादृष्टीने ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवडा’ जाहीर करण्यात आला असून या अंतर्गत राबविण्यात येणा-या ‘स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता’ अभियानात सर्व नवी मुंबईकर नागरिक उत्साहाने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करतील असा विश्वास नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी व्यक्त केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा पंधरवड्याचा शुभारंभ वाशी सेक्टर 6 येथे जागृतेश्वर तलाव परिसर सखोल स्वच्छता मोहीमेव्दारे संपन्न झाला. यामध्ये नमुंमपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.कैलास शिंदे, माजी आमदार संदीप नाईक, ‘स्वच्छ महाराष्ट्र मिशन’चे राज्य संचालक नवनाथ वाठ व उपआयुक्त मल्लिकार्जुन पाटील, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व शिरीष आरदवाड तसेच महानगरपालिकेचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी आणि -स्वच्छ नवी मुंबई मिशन’च्या वुमन आयकॉन रिचा समित व युथ आयकॉन नामांकित जलतरणपटू शुभम वनमाळी त्याचप्रमाणे विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एनएसएसचे विद्यार्थी, शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.अनंत चतुर्दशीदिनी मोठया प्रमाणावर श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन होत असते. अगदी पहाटेपर्यंत हा विसर्जन सोहळा सुरू होता. या अनुषंगाने विसर्जनस्थळ परिसराच्या स्वच्छतेपासून स्वच्छता ही सेवा अभियानाला प्रारंभ करावा या भूमिकेतून आयुक्त महोदयांच्या संकल्पनेमधून वाशी जागृतेश्वर तलाव परिसराची सखोल स्वच्छता करीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये 600 हून अधिक अधिकारी, कर्मचारी, नागरिकांनी सहभागी होत हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला.याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे राज्य संचालक नवनाथ वाठ यांनी स्वच्छता ही सेवा अभियानाचे महत्व सांगत प्रत्येक नागरिकाने जर आपल्याकडून कचरा निर्मितीच कमीत कमी कशी होईल याची काळजी घेतली तर स्वच्छता कामासाठी होणारा यंत्रणेवरील ताण व खर्च कमी होईल असे मत मांडले. स्वच्छतेमध्ये नवी मुंबई सातत्याने प्रगती करीत असल्याने नवी मुंबईकडून राज्याला खूप मोठ्या अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज स्वच्छताविषयक विविध उपक्रम राबविले जाणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी दिली. यामध्ये - रेल्वे स्टेशन स्वच्छता, हायवे स्वच्छता, मॅनग्रुव्हज स्वच्छता, शाळा रुग्णालये व कार्यालये स्वच्छता त्याचप्रमाणे आशियातील सर्वात मोठ्या एपीएमसी मार्केटमध्ये व्यापक स्वरूपात सखोल स्वच्छता मोहीम राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय जुने कपडे व ई-कचरा दान, वक्तृत्व, घोषवाक्य, कॅनव्हास पेंटिंग, प्रश्नमंजुषा, निबंध, रांगोळी, स्वच्छता दौड, सायकल रॅली अशा अनेक उपक्रमांचेही आयोजन करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले.यावेळी स्वच्छता ही सेवा मोहीमेचा प्रचार करण्यासाठी सजवलेल्या एनएमएमटी बसेसमधील प्रातिनिधिक स्वरूपातील एका बसला झेंडा दाखवून अभियान प्रसिध्दी मोहीमेचाही आरंभ करण्यात आला. तसेच स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली.वाशी येथील जागृतेश्वर तलाव परिसर सखोल स्वच्छता मोहीमेप्रमाणेच नमुंमपा क्षेत्रात विविध विभागांतील विसर्जन तलावांच्या परिसरातही संबंधित विभाग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली विशेष स्वच्छता मोहीमा राबवून विसर्जन स्थळ परिसर स्वच्छ करण्यात आला.स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात संपन्न होणा-या सर्व उपक्रमांची माहिती महानगरपालिकेच्या सर्व सोशल माध्यमांवर करण्यात आली असून नागरिकांनी त्यात मोठ्या संख्यने सहभागी व्हावे असे आवाहन घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे व डॉ,संतोष वारूळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.