आईने दिले आपल्या १४ वर्षांच्या मुलाला जीवनदान, मूत्रपिंड दान करुन एका मातेने तीव्र मूत्रपिंडाच्या आजारातून वाचवलं आपल्या चिमुकल्याला

नवी मुंबई :- हे खरं आहे की स्त्रीया मोठ्या मनाच्या असतात ८०% स्त्रीयांनी आपले अवयव दान केले आहेत, हा त्यांच्या मोठ्या मनाचा आणि दानशूरपणाचा पुरावाच आहे. जेव्हा इतरांना जीवन देण्याचा प्रश्न उद्भवतो तेव्हा स्त्रीया कधीच संकोच करत नाहीत. हे पुन्हा एकदा जागतिक महिलादिनी एका मातेने सिद्ध केले आहे निशांथ कुमार आणि त्याची आई गुंजन कुमार यांची ही कहाणी स्त्रीच्या दानशूरपणाची साक्ष देते. १४ वर्षांचा निशांथ कुमार क्रॉनिक किडनी डिसीजशी (तीव्र मूत्रपिंडाच्या आजाराशी) झुंज देत होता. पण गुंजन कुमार नामक त्याच्या आईने त्याला अनमोल भेट देऊन त्याला एक नवं आयुष्य प्रदान केलं आहे.

                     झारखंडमध्ये राहणाऱ्या किशोरवयीन मुलाला १० नोव्हेंबर २०२० रोजी आकडी आली आणि त्याच्या संपूर्ण शरीरावर सूज होती. यासाठी धनबागमधल्या एका स्थानिक डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला, डॉक्टरांनी तपासल्यावर त्या मुलाला क्रॉनिक किडनी डिसीज झाल्याचे समजले. या तणावाच्या परिस्थितीत त्या कुटुंबाने आपल्या सर्व नातेवाईकांना संपर्क करायला सुरुवात केली. निशांथच्या प्रकृतीची जाणीव झाल्यानंतर नवी मुंबईतील नातेवाईकाने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलला भेट देऊन त्यांचा सल्ला घेण्यास सांगितले. नेफ्रॉलॉजी विशेषज्ञ डॉ. रविंद्र निकाळजी आणि रोबोटिक युरोलॉजी आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जरीचे विशेषज्ञ डॉ. अमोल कुमार पाटील यांनी केलेल्या सखोल वैद्यकीय तपासणीमुळे कुटुंबाला हे कळलं की त्यांच्या मुलावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. पुढील मूल्यमापन केल्यानंतर, असे लक्षात आले की रुग्णाची आई गुंजन कुमार रुग्णाला मूत्रपिंड दान करण्यास योग्य आहे. त्यानंतर मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यविशारद डॉ. अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी डॉ. रविंद्र निकाळजी आणि डॉ. अमित लंगोटे आणि विशेषज्ञांच्या टीमद्वारे मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया नियोजित करण्यात आली.आपल्या मुलाला मूत्रपिंड दान करणाऱ्या गुंजन कुमार म्हणाल्या की “माझ्या मुलाच्या मूत्रपिंडाच्या अवस्थेविषयी जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्ही हादरुन गेलो होतो. आम्ही संकटात सापडलो होतो आणि आम्हाला कळत नव्हतं की अशा परिस्थितीत आम्हाला कोण मदत करेल. जेव्हा मला कळलं की मी मूत्रपिंड दान करण्यास योग्य व्यक्ती आहे, त्यावेळी मी क्षणाचाही विचार न करता किंवा संकोच न करता लगेच मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी होकार दिला. माझ्या मुलाला नवं आयुष्य मिळाल्यामुळे मला खूप चांगलं वाटत आहे आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाली याचा मला आनंद होत आहे. मी माझ्या मुलाला ही अनमोल भेट देऊ शकले हे खरंच खूप चमत्कारिक आहे.”अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे नेफ्रॉलॉजी तज्ञ डॉ. रविंद्र निकाळजी म्हणाले, “निशांतच्या आईने त्याला अवयव दान करुन स्त्रीया किती दानशूर असतात याचं उदाहरण प्रस्थापित केलं आहे आणि स्त्रीया आपल्या कुटुंबासाठी काही करु शकतात हे दाखवून दिलं आहे. आम्ही चाचण्या केल्यावर आम्हाला कळलं की त्याला मूत्रपिंड प्रत्यारोपणाची गरज आहे. बऱ्याचदा आम्ही रुग्णावर डायलिसिस उपचार करतो पण निशांथच्या बाबतीत मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याची खूप आवश्यकता होती. वैद्यकीय मूल्यांकन केल्यानंतर, त्याची आई मूत्रपिंड दान करण्यास योग्य व्यक्ती असल्याचे समजले. मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे झाली असून दाता आणि रुग्ण दोघांचीही तब्येत उत्तम आहे.”अपोलो हॉस्पिटल्स, नवी मुंबईचे रोबोटिक युरोलॉजी आणि मूत्रपिंड शल्यविशारद तज्ञ डॉ. अमोल कुमार पाटील या प्रकरणाबद्दल सविस्तर सांगताना म्हणाले की, “मूत्रपिंडाची कार्यशक्ती खूप बिघडल्यामुळे आम्ही रुग्णावर हेमोडायलिसिस उपचार केले. आठवड्यातून दोन वेळा त्याला डायलिसिस देण्यात येत होते, त्याचबरोबर आम्ही मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्लाही दिला होता. तेव्हा त्या मुलाची तरुण आई श्रीमती गुंजन कुमार पुढे आली आणि तिने मूत्रपिंड दान करण्याची इच्छा व्यक्त केली, चाचणी केल्यानंतर त्याची आई ही मूत्रपिंड दान करण्यास योग्य असल्याचे समजले. आम्ही ३ फेब्रुवारीला शस्त्रक्रियेचे नियोजन केले आणि मूत्रपिंड शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्या मुलाच्या मूत्रपिंडाची कार्यशक्ती आता चांगली आहे आणि सामान्य क्रिएटिनाईन आढळल्यामुळे त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.”

Popular posts
नवीन कामगार नियमांना मान्यता, लाखो कामगारांचे हित (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता
Image
लहान कुटुंब नियमाचे उलंघन करणाऱ्या सर्व अग्निशमन अधिकाऱ्यांची चौकशी - अग्निशनम केंद्र प्रमुख
Image
प्रलंबित पगारवाढीवरून राज्यातील हजारो सुरक्षा रक्षक संभ्रमात , नेमकी दिशाभूल कोणाची संघटनांची कि शासनाची ?
Image
वाढत्या अनधिकृत बांधकामांच्या तक्रारीचा विभागवार आढावा मनपा आयुक्तांनी घ्यावा. तक्रार अर्जांच्या नावाखाली अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार
Image
नवी मुंबई मनपा देशात स्वछ सर्वेक्षणात प्रथम येणार की भ्रष्टाचारात ? , सेवानिवृत्ती पूर्व मनपा उपायुक्तांचे मिशन भ्रष्टाचार ? , बदली, अतिक्रमण कारवाया न करण्याच्या सूचना, फक्त सेटलमेंट ?
Image