नवी मुंबई महानगरपालिकेची 20 आयसीयू बेड्सची आरोग्य सुविधा सुरू

नवी मुंबई :- महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांवरील उपचारासाठी त्यांच्या लक्षणांच्या स्वरूपानुसार योग्य बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी, रूग्णसंख्या वाढणार असल्याचा अंदाज येऊ लागताच, तत्परतेने आधीपासूनच सुरूवात करण्यात आलेली आहे. यामध्येही विशेषत्वाने आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची कमतरता लक्षात घेऊन खाजगी रूग्णालयांतील आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची वाढ करण्याकडे लक्ष देण्यासोबतच महानगरपालिकेच्या कोव्हीड सुविधांमधील आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स संख्येत वाढ केली जात आहे.सध्या नेरूळ येथील डॉ. डि.वाय.पाटील रूग्णालयात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 200 आयसीयू बेड्स आणि 80 व्हेंटिलेटर्सची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. महानगरपालिकेच्या या सुविधेत वाढ करण्याच्या दृष्टीने आता कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात नियोजित 100 आयसीयू बेड्स आणि 40 व्हेंटिलेटर्सपैकी पहिल्या टप्प्यात आजपासून 20 आयसीयू बेड्स आणि 10 व्हेटिलेटर्सची सुविधा कार्यान्वित झालेली आहे.

                   13 एप्रिलला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील कामाची पाहणी करून लवकरात लवकर ही सुविधा नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावी असे निर्देश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना दिले होते.त्यास अनुसरून कालबध्द काम करीत चारच दिवसात 20 आयसीयू बेड्ससह 10 व्हेटिलेटर्सची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे आयसीयू बेड्स व व्हेटिलेटर्स उपलब्धतेमध्ये होणारी कोरोना बाधितांची अडचण काही प्रमाणात दूर होणार आहे. आगामी 10 दिवसांच्या कालावधीत उर्वरित आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्स टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिले जात आहेत.दररोज संध्याकाळी 7 वाजल्यापासून महापालिका आयुक्त अभिजीत बांगर नियमितपणे 3 ते 4 तास वेबसंवादाव्दारे सर्व खाजगी रूग्णालयांतील महानगरपालिकेचे नोडल अधिकारी तसेच सर्व नागरी आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी तसेच सर्व विभागांचे सहा.आयुक्त आणि आरोग्य विभागातील व इतर विभागांचे या कामाशी संबंधित अधिकारी यांच्याशी चर्चा करीत असून यामधून पुढील कार्यवाहीची दिशा ठरविली जात आहे.

यामध्ये ट्रिटमेंट प्रोटोकॉल सोबतच डिस्चार्ज प्रोटकॉलचे पालन करण्यावर भर देण्याचे निर्देशित करण्यात येत असून त्याचा रूग्णालयनिहाय आढावा घेतला जात आहे. याशिवाय बेड्स उपलब्धता, रूग्णवाहिका, ऑक्सिजन, ऑषधसाठा, रूग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध (कॉन्टॅक्ट ट्रेसींग), कन्टेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी या महत्वाच्या बाबींचाही तपशील जाणून घेतला जात आहे तसेच त्यामध्ये सुधारणा सूचविल्या जात आहेत.महानगरपालिकेच्या वतीने अधिकाधिक आरोग्य सुविधा वाढीवर भर देत असतानाच कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीकडेही बारकाईने लक्ष देण्यात येत आहे. यामध्ये नागरिकांचे सहकार्य सर्वात महत्वाचे असून नागरिकांनी 'ब्रेक द चेन' आदेशानुसार जाहीर केलेल्या संचारबंदीतील प्रतिबंधांचे काटेकोर पालन करावे असे सूचित करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी शक्यतो घराबाहेर पडू नये आणि अत्यावश्यक बाबींसाठी काही वेळ घराबाहेर पडल्यास पूर्णवेळ मास्क परिधान करावा आणि कोणत्याही ठिकाणी आपल्यामुळे गर्दी होणार नाही याचे भान राखत सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे व नियमित हात स्वच्छ ठेवावेत असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे. 

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image