नवी मुंबई - कोव्हीडमधून बरे झाल्यानंतर अनियंत्रित मधुमेह, कॅन्सर, किडनीचे विकार असलेल्या तसेच ज्यांना कोव्हीड उपचारादरम्यान स्टिरॉईड दिलेले आहे अशा व्यक्तींनी म्युकरमायकोसिस बाबत जागरूक रहावे व लक्षणे जाणवल्यास त्वरीत जवळच्या महानगरपालिका रुग्णालयातील म्युकरमायकोसिस ओपीडी मध्ये जाऊन विनामूल्य तपासणी करून घ्यावी तसेच म्युकरमायकोसिसवरील काहीसे महागडे असलेले उपचार महानगरपालिकेच्या वतीने मोफत केले जात आहेत, त्यामुळे लक्षणे लपवू नयेत याविषयी लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी अधिक व्यापक जनजागृती करावी अशी सूचना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोव्हीड टास्क फोर्स सदस्यांनी केली.
महानगरपालिका क्षेत्रातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णस्थितीचा आढावा आणि उपचारपध्दती याविषयी विचार विनीमय करणेबाबत आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोव्हीड टास्क फोर्सशी वेबसंवाद साधला.याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे तसेच वेबसंवादाव्दारे नवी मुंबई महानगरपालिका कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य नायर हॉस्पिटलचे मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गिरीश राजाध्यक्ष, किंग एडवर्ड मेमोरिअल हॉस्पिटलचे कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. गजानन वेल्हाळ, कार्डिओलॉ़जिस्ट डॉ. उदय जाधव, बालरोगतज्ज्ञ डॉ. उपेंद्र किजवडेकर, इन्टेसिव्हिस्ट डॉ. अक्षय छल्लानी, ॲनेस्थेटिस्ट डॉ. जेसी एलिझाबेथ, फिजीशिअन डॉ. अजय कुकरेजा, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ. समीर बोभे आदी तज्ज्ञ डॉक्टर्स सहभगी झाले होते.कोरोनामधून बरे झाल्यानंतर 6 ते 8 आठवडे म्युकरमायकोसिसबाबत काळजी घेण्याची गरज आहे हे लक्षात घेऊन नवी मुंबई महानगरपालिकेच्या कॉल सेंटरमार्फत 1 एप्रिलपासून रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या 9 हजाराहून अधिक कोरोनामुक्त व्यक्तींना दूरध्वनीव्दारे त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यात आली आहे. त्यामधील म्युकरमायकोसिसची जोखीम असलेल्या 950 हून अधिक मधुमेही रुग्णांना दररोज फोन करून त्यांच्या प्रकृतीविषयी विचारणा करण्यात येत आहे अशी माहिती आयुक्तांनी दिली.त्यावर गृह विलगीकरणात राहून कोरोनामुक्त झालेल्या मधुमेही व किडनीचे विकार असलेल्या रुग्णांचीही काळजी घेण्याच्या दृष्टीने त्यांच्यापर्यंत कोरोनाच्या लक्षणांबाबत तसेच महानगरपालिकेमार्फत तपासणी आणि उपचार मोफत आहेत याची माहिती पोहोचवावी अशी सूचना टास्क फोर्समार्फत करण्यात आली. म्युकरमायकोसिस बाबत जनजागृती करण्यासाठी सोशल माध्यमांप्रमाणेच शहरात ठिकठिकाणी मोठी होर्डींगही लावण्यात आलेली आहेत. त्यामध्ये वाढ करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितले. त्याचप्रमाणे जनतेमध्ये म्युकरमायकोसिसची माहिती व त्याबाबत घ्यावयाची काळजी याची माहिती प्रसारित करण्यासाठी टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टरांनी व्हिडिओ क्लिप्स तयार करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्तांनी केले.यामध्ये खाजगी डॉक्टरांची भूमिका अत्यंत महत्वाची असल्याचे अधोरेखीत करीत नागरिक आपल्या प्रकृतीबाबत सर्वप्रथम त्यांच्या जवळच्या खाजगी डॉक्टरांशी संपर्क साधतात. त्यामुळे म्युकरमायकोसिसबाबत खाजगी डॉक्टर्समध्ये जागरूकता व सतर्कता आणण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा असे टास्क फोर्स मार्फत सूचित करण्यात आले. याबाबत त्वरीत निर्णय घेत आयुक्तांनी खाजगी डॉक्टरांची वेबिनारव्दारे कार्यशाळा आयोजित करण्यात येईल असे सांगितले. रुग्णालयीन उपचारादरम्यान स्टिरॉईडच्या प्रमाणित वापराबाबतही डॉक्टरांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज टास्क फोर्सने व्यक्त केली.कोव्हीड बाधीत रुग्ण उपचार घेत असतानाच त्याचा मधुमेह नियंत्रणात आहे काय याबाबतची नियमित तपासणी करण्यात यावी व असे रुग्ण डिस्चार्ज होताना त्यांना पुढील 6 ते 8 आठवडे काळजी घेणेबाबत म्युकरमायकोसिसच्या लक्षणांची माहिती देणारे पत्रक द्यावे व काही लक्षणे जाणवल्यास महानगरपालिकेशी त्वरीत संपर्क साधण्यास सांगावे असेही सूचित करण्यात आले.नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे प्रमाण नियंत्रित असल्याबद्दल टास्क फोर्सच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र कायम जागरूकता राखून हे प्रमाण वाढणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना केली.म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी सुपरस्पेशालिटी रुग्णालयांची आवश्यकता असते. अशी रुग्णालये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर असल्याने महानगरपालिका क्षेत्राबाहेरील अनेक रुग्ण येथील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल होतात. सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात म्युकरमायकोसिसचे 19 रुग्ण उपचार घेत असून त्यामधील 10 रुग्ण हे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेरील आहेत.नवी मुंबई महानगरपालिका म्युकरमायकोसिसवरील उपचारांबाबत अत्यंत दक्ष असून महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली या तिन्ही रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या तपासणीसाठी विशेष बाह्यरुग्ण सेवा कक्ष (ओपीडी) सुरु करण्यात आलेला आहे. याठिकाणी मोफत तपासणी व आवश्यक टेस्टींग करण्यात येत असून यामध्ये एखाद्या व्यक्तीस म्युकरमायकोसिसची लागण झाली असल्याचे आढळल्यास त्याच्यावरील उपचारासाठी महानगरपालिकेच्या वाशी रुग्णालयात विनामूल्य उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्युकरमायकोसिसवरील उपचारांमध्ये काही औषधे ही महाग असून ही औषधेही महानगरपालिकेमार्फत उपचारादरम्यान मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत.तरी कोव्हीडमधून बरे झालेल्या नागरिकांनी 6 ते 8 आठवडे काळजी घेऊन तीव्र डोकेदुखी, गाल दुखणे अथवा सुजणे, नाक बंद होणे अथवा दुखणे, नाक सतत वाहू लागणे, डोळे लाल होणे अथवा सुजणे, दृष्टी अधू होणे, एकच वस्तू डबल दिसणे, दात हलू लागणे अशाप्रकारची लक्षणे आढळल्यास ती न लपवता त्वरीत महानगरपालिकेच्या वाशी, नेरुळ व ऐरोली यापैकी नजीकच्या रुग्णालयातील ओपीडीमध्ये मोफत तपासणी करून घ्यावी असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.