पुण्यातून 'अपोलो' बेलापूरपर्यंत हृदय फक्त ८३ मिनिटांत, २९ वर्षांच्या तरुणावर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार

नवी मुंबई : मुंबईतील रहिवासी, इलेक्ट्रिकल काम करणारे २९ वर्षांचे रवी शर्मन अहिरवार यांच्यावर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे. पुण्यातील एका महिलेचे हृदय त्यांना दान करण्यात आले.या महिलेला २ जुलै रोजी मेंदूमध्ये रक्त्तस्राव होऊ लागला. अनेक प्रयत्न करून देखील त्या उपचारांना प्रतिसाद देण्यात असमर्थ ठरल्या आणि त्यामुळे क्लिनिकल नियमांनुसार त्यांना १४ जुलै रोजी ब्रेन डेड म्हणून घोषित करण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांचे समुपदेशन करण्यात आले व त्यांनी अवयव दानाला मनापासून सहमती दर्शवली. या महिलेचे यकृत व हृदय दान करण्यात आले. पुण्यातील एका ६१ वर्षीय रुग्णाच्या शरीरात यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. दान करण्यात आलेले हृदय पुण्यातून बेलापूरपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आणि पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधून बेलापूरमधील अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे फक्त ८३ मिनिटांत १५ जुलै रोजी सकाळी १०:०३ मिनिटांनी हे हृदय पोहोचवले गेले.

                  या शस्त्रक्रियेचे प्रमुख डॉक्टर अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथील कन्सल्टन्ट, सीव्हीटीएस आणि हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी डॉ. संजीव जाधव यांनी सांगितले, "रवी यांना डायलेटेड कार्डीओमायोपॅथीचा त्रास होत होता ज्यामुळे ते हृदय निकामी होण्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचले होते. त्यांच्या या त्रासाचे निदान २००७ साली करण्यात आले.२०१९ मध्ये लक्षणे वाढली, अगदी काही पावले चालल्यावर देखील धाप लागणे, पायांवर सूज आणि फुफ्फुसे व पोटात द्रव जमा होणे असे त्रास होत होते.हृदयावरील उपचारांसाठी त्यांना महिन्यातून २ ते ३ वेळा रुग्णालयात भरती करावे लागत होते.फेब्रुवारी २०२० मध्ये क्लिनिकल नियमांना अनुसरून झेडटीसीसीकडे हृदय प्रत्यारोपणासाठी त्यांची नावनोंदणी करण्यात आली.तब्बल वर्षभर ते प्रतीक्षायादीवर होते आणि त्या काळात त्यांचे हृदय फक्त १५% काम करू शकत होते.  झेडटीसीसीमार्फत असे समजले की पुण्यामध्ये एक पात्र दाता उपलब्ध आहे.आम्ही तातडीने याची माहिती रुग्णाला दिली आणि हृदय प्रत्यारोपणासाठी सर्व आवश्यक तयारी केली.सकाळी ८.३० वाजता पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमधून या हृदयाचा प्रवास सुरु झाला आणि ग्रीन कॉरिडॉरच्या मदतीने पुढच्या अवघ्या ८३ मिनिटांत ते बेलापूरमधील अपोलो हॉस्पिटल्समध्ये पोहोचवण्यात आले.१ तास ३० मिनिटांत या हृदयाचे प्रत्यारोपण करण्यात आले.शस्त्रक्रियेनंतर आता रुग्ण बरा आहे, शुद्धीवर आलेला आहे आणि आजूबाजूला काय बोलले जात आहे ते त्याला समजते आहे.आजवर अपोलो हॉस्पिटल्समध्ये ५ हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या आहेत.अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईचे सीओओ आणि युनिट हेड संतोष मराठे यांनी सांगितले, "अवयवदानाबाबत जागरूकता वाढत आहे याचा आम्हाला आनंद आहे.  अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील अनेक रुग्णालयांच्या सहयोगाने आउटबाउंड ट्रान्सप्लांट्स करते, आम्ही आजवर अशा ९ केसेसमध्ये शस्त्रक्रिया केल्या आहेत.  भारतात हृदयाच्या आजारांच्या केसेसची वाढती संख्या एक गंभीर समस्या बनली आहे आणि पसरत असलेल्या महामारीमुळे या आजारांचा धोका अधिकच वाढला आहे.  खूपच कमी काळात अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने पश्चिम भारतातील सर्वात आधुनिक ट्रान्सप्लांट सेंटर्समध्ये स्थान मिळवले आहे.  आमच्या हॉस्पिटल्समध्ये लिव्हर, किडनी, हार्ट आणि बोन मॅरो ट्रान्सप्लांट्स केले जातात, आम्ही या क्षेत्रात स्पेशलिस्ट्सच्या विशेष टीमसह सर्वोत्तम क्लिनिकल परिणामांसह प्रगती करत आगेकूच करत आहोत.

Popular posts
दोनदा कारवाई नंतरही पुन्हा सारसोळे गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम सुरु, नेरुळ विभाग कार्यालयाच्या भूमिकेवर संशय ? हाकेच्या अंतरावर असूनही कारवाई नाही.
Image
मनपाच्या कारवाई नंतर शिरवणे गावातील इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु
Image
कोपरखैरणे विभागाची कामगिरी कौतुकास्पद ? , तक्रार प्राप्त अनधिकृत इमारतीला आशीर्वाद, तर दुसऱ्यावर कारवाई , अनधिकृत इमारत कधी पूर्ण होणार याची अधिकाऱ्यांना प्रतीक्षा ?
Image
तोडकं कारवाई नंतर सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीचे बांधकाम पुन्हा सुरु , कारवाई नंतर सिडको बरोबर सेटलमेंट झाल्याची चर्चा गावात ?
Image
सानपाडा गावातील अनधिकृत इमारतीला सिडकोची नोट
Image