काटेकोपरपणे व गतीमानतेने स्वच्छता व सुशोभिकरण कामांकडे विशेष लक्ष देण्याचे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांकडून निर्देश

नवी मुंबई :- शहर स्वच्छतेमध्ये देशात तृतीय क्रमांकाचा उच्च स्तर गाठल्यानंतर तो स्तर उंचाविण्याची आपली जबाबदारी वाढली असून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ला सामोरे जाताना आपल्या कामामध्ये अधिक नीटनेटकपणा आणावा आणि क्षेत्रीय स्तरापासून महानगरपालिकेच्या सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचारी यांनी अधिक काटेकोपरपणे व गतीमानतेने स्वच्छता व सुशोभिकरण कामांकडे विशेष लक्ष द्यावे असे निर्देश महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले.

      ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३ विषयक कामांच्या आढावा बैठकीत आयुक्तांनी प्रत्येक स्तरावरून केलेल्या कामाचे निरीक्षण व परीक्षण केले जाईल तसेच या कामांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले व संजय काकडे, शहर अभियंता संजय देसाई तसेच सर्व विभागप्रमुख, विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी व संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वच्छताविषयक कामे सुव्यवस्थित रितीने व्हावीत व त्यावर सुयोग्य नियंत्रण असावे यादृष्टीने कृती आराखडा मांडला व त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. यामध्ये प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रासाठी विभागप्रमुख दर्जाचा नोडल अधिकारी नियुक्त करून त्यांच्याव्दारे आठवड्यातून एकदा स्वच्छताविषयक कामांचे निरीक्षण केले जाईल स्पष्ट केले. स्वच्छता कामांचा दर्जा राखला जावा याकरिता स्वच्छ भारत मिशनच्या टूलकिटनुसार १४बाबींची चेकलिस्ट तयार करण्यात आली असून त्या चेकलिस्टप्रमाणे क्षेत्रीय स्तरापासून मुख्यालय स्तरापर्यंत स्वच्छता निरीक्षणाची जबाबादारी सोपविलेल्या प्रत्येक अधिका-याने तपासणी करावी असे आयुक्तांनी निर्देशित केले.यापुढील काळात आठवड्याभरात केलेल्या स्वच्छता कामांचा प्रत्येक मंगळवारी आयुक्तांमार्फत विभागनिहाय आढावा घेतला जाणार असून त्यासोबतच आयुक्त विभागवार भेटी देऊन प्रत्यक्ष पाहणी देखील करणार आहेत.स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरण हा देखील एक महत्वाचा भाग असून सुशोभिकरणाची कामे तत्परतेने सुरु करावीत व त्यामध्ये मागील वर्षीच्या चांगल्या चित्रभिंती धुवून घेणे, आवश्यकतेनुसार काही चित्रभिंतींची पुनर्रंगरंगोटी करणे व नव्या संकल्पना राबवून काही चित्रभिंती नव्याने निर्माण करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.याशिवाय शिल्पाकृतींची डागडूजी तसेच कारंजे दुरुस्ती करून ती कार्यान्वित करण्याची कार्यवाही तातडीने करावी असेही निर्देश आयुक्तांनी दिले. सुशोभिकरण कामांचा प्रभाव प्रथमदर्शनी नजरेत भरेल अशा दृश्य स्वरुपात साकारला पाहिजे असे स्पष्ट करीत आयुक्तांनी नागरिकांना आनंद वाटेल अशाप्रकारे नवी मुंबईचे चित्र बदलून टाका अशा सूचना केल्या.स्वच्छतेमध्ये देशातील तृतीय क्रमांकाच्या मानांकनात नवी मुंबईकर नागरिकांच्या सहभागाचा महत्वाचा वाटा असून प्रत्येक विभागात आठवड्यातून किमान एक स्वच्छता विषयक उपकम लोकांच्या सहभागातून राबवावा आणि त्याला व्यापक प्रसिध्दी द्यावी अशाही सूचना आयुक्तांनी याप्रसंगी केल्या. स्वच्छतेच्या अनुषंगाने कोणत्या बाबींची तपासणी करायची याविषयी सादरीकरणाव्दारे बाबनिहाय सविस्तर माहिती देण्यात आली.आपण करीत असलेल्या स्वच्छताविषयक कामात सातत्याने सुधारणा करणे व समोर दिसत असलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी उपाययोजना करीत राहणे गरजेचे असून ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२ पेक्षा अधिक चांगले चित्र निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी स्वयंस्फूर्तीने काम करावे असे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. आजच्या बैठकीतील प्रत्येकाने जबाबदारीने काम करण्याचा हा संदेश महानगरपालिकेच्या सर्व विभागातील कर्मचा-यापर्यंत पोहचवावा व त्याच्या तीव्रतेची जाणीव करून द्यावी असेही त्यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना सूचित केले. प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी अधिक कृतीशील होण्याची गरज व्यक्त करीत प्लास्टिक प्रतिबंधात्मक मोहीमा पुढाकार घेत राबवाव्यात असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भाग सिडको, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एपीएमसी, एमएसईडीसी अशा विविध प्राधिकरणांकडे असून त्यांनाही शहर स्वच्छतेचे महत्व जाणवून देण्याची गरज असल्याचे स्पष्ट करीत या प्राधिकरणांसमवेत तत्परतेने स्वच्छता विषयक चर्चात्मक बैठकीचे आयोजन करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.‘निश्चय केला - नंबर पहिला’ हे आपले ध्येय केवळ घोषणेपुरते नसून ते साकारण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करण्याची गरज असल्याचे सांगत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी माझ्यासह सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या उद्दिष्ट पूर्तीसाठी कटिबध्द होऊया व याकामी स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेऊया असे सूचित केले.