1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडून आढावा , एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार , सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह

नवी मुंबई :- शहर सुरक्षीततेला बळकटी देणा-या सीसीटीव्ही प्रकल्पाच्या कामास सुरुवात झालेली असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सीसीटीव्ही प्रणाली मुख्य नियंत्रण कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रकल्प अधिक परिपूर्ण व सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टीने मौल्यवान सूचना केल्या.मनपाच्या वतीने 1500 हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे संपूर्ण शहरभर बसविण्यात येत असून त्याचा मध्यवर्ती नियंत्रण कक्ष महापालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावर स्थापित करण्यात आला आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 702 विविध प्रकारचे हायडेफिनेशन कॅमेरे बसविण्यात आले असून 63 कॅमेरे मुख्य नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आलेले आहेत.

               आयुक्तांनी मुख्य नियंत्रण कक्षाच्या भेटीमध्ये कॅमेरा लावलेल्या ठिकाणावरील सीसीटीव्ही छायाचित्रीकरण बारकाईने पाहिले. हे सर्व कॅमेरे हायडेफिनेशन असून आयुक्तांनी नियंत्रण कक्षाशी जोडलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांव्दारे झूम इन व झूम आऊट करून शहरात काही भागात सुरु असलेल्या हालचालींची पाहणी केली.सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी 592 ठिकाणी खाबांकरिता कॉंक्रिटचा पाया तयार करण्यात आला असून 534 खांब उभारण्यात आलेले आहेत. आयुक्तांनी ही सर्व माहिती सविस्तर जाणून घेतली व कोणत्या भागातील कॅमेरे कार्यान्वित झालेले आहेत तसेच कोणत्या भागातील खांब बसवून झालेले आहेत याची विस्तृत माहिती घेतली.या प्रकल्पांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 540 स्थानांवर विविध प्रकारचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून 230 स्थानांवर कॅमेरे बसवून झालेले आहेत. त्यामध्ये शहरातील मुख्य चौक, बस डेपो, मार्केट्स, उद्याने, मैदाने, नाके, वर्दळीची ठिकाणे, नमुंमपा कार्यालये, पामबीच, ठाणे बेलापूर रोड, सायन पनवेल असे जास्त रहदारीचे रस्ते येथे हाय डेफिनेश कॅमेरे बसविण्यात येत आहेत.या कॅमे-यांमध्ये 954 स्थिर कॅमे-यांचा तसेच 360 अंशामध्ये गोलाकार चित्रण टिपणा-या 165 पीटीझे़ड कॅमे-यांचा समावेश आहे. याशिवाय नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राला लाभलेला विस्तारित सागरी किनारा लक्षात घेऊन सागरी सुरक्षेच्या दृष्टीने 9 थर्मल कॅमेरे बसविण्यात येत आहेत.त्याचप्रमाणे पोलीस विभागाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे 96 इव्हिडन्स कॅमेरे हे 24 मुख्य ट्रॅफिक जंक्शनवर बसविण्यात येत असून 288 एएनपीआर म्हणजेच ॲटोमॅटीक नंबर प्लेट रेक्गनेशन कॅमेरे देखील बसविण्यात येत आहेत. या एएनपीआर कॅमे-याव्दारे स्वयंचलीत पध्दतीने वाहनांवरील नंबर प्लेट वाचन करता येणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर सिग्नल तोडणा-या तसेच वाहतुकीच्या इतर नियमांचा भंग करणा-या वाहनचालकांच्या घरी थेट दंडात्मक चलन फोटोसह पाठविले जाणार आहे.यासोबतच 24 ट्रॅफिक जंक्शनवर पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम बसविण्यात येत असून याव्दारे आपत्कालीन व्यवस्थेच्या दृष्टीने अत्यावश्यक क्षणी नागरिकांकरिता सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून महत्वाच्या सूचना देणे शक्य होणार आहे.या सीसीटीव्ही प्रणालीच्या मुख्य केंद्रीय नियंत्रण कक्ष (Integrated Command and Control Centre) नमुंमपा मुख्यालय येथे सुरु करण्यात आला असून तेथील कार्यप्रणालीची विस्तृत माहिती आयुक्त राजेश नार्वेकर यांनी त्याठिकाणी भेट देत जाणून घेतली. हा नियंत्रण कक्ष नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथील विशेष कक्षाशी जोडलेला असणार आहे. अशाच प्रकारचा निरीक्षण कक्ष वाहतुक पोलीस उपायुक्त कार्यालय तसेच पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 यांचे कार्यालयातही असणार आहे.या सर्व सीसीटिव्ही कॅमे-यांमधील चित्रीकरणाची नियंत्रण कक्षातील संग्रहण क्षमता 30 दिवसांची असणार असून या प्रणालीमध्ये महत्वाच्या प्रसंग, घटना यांचे सीसीटिव्ही चित्रीकरण स्वतंत्रपणे संग्रहण करून ठेवण्याची सुविधा उपलब्ध आहे.या सीसीटीव्ही प्रणालीव्दारे नवी मुंबईच्या शहर सुरक्षिततेचे सक्षमीकरण होणार असून याबाबत पोलीस विभागाशी समन्वय साधून ही प्रणाली अधिक प्रभावीपणे कार्यरत राहण्याच्या दृष्टीने पोलीसांसोबत संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना आयुक्तांनी संबंधित विभागास दिल्या. 

Popular posts
शिरवणे गावातील बेकायदेशीर लॉजिंगला आशीर्वाद कोणाचा ? , ग्रामस्थांची नाराजी तर मनपाची कारवाईला दिरंगाई
Image
भारतातील सर्वात मोठा 'नमो कुस्ती महाकुंभ जामनेर मध्ये, भारतातील दिग्गज पैलवानांमध्ये एकाच मंचावर घमासान
Image
भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे नवी मुंबई महानगरपालिका कलंकीत , स्वछ सर्वेक्षण, देखभाल दुरुस्ती, अतिक्रमण घोटाळे आघाडीवर , मुंबई मनपा च्या धर्तीवर नवी मुंबईतील घोटाळ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चौकशी करणार का ?
Image
वनराई नष्ट करून एम.आय.डी.सी प्राधिकरणाची प्रदूषणाकडे वाटचाल, हजारो वृक्षांची कत्तल, अधिकारी गप्प ?, कायद्याचे रक्षकच बनले कायद्याचे भक्षक, एम.आय.डी.सी.कडून परवानगी नसतांनाही कंत्राटदाराकडून वृक्षतोड
Image