४७ किलोचा ट्युमर काढून एका महिलेला दिले डॉक्टरांनी नवजीवन भारतात प्रथमच अंडाशयाच्या बाहेर असलेला ४७ किलो ट्युमर यशस्वीपणे शरत्रक्रियेने बाहेर काढला

नवी मुंबई : अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने ५६ वर्षीय स्त्रीच्या शरीरातून ४७ किलो वजनाचा ट्युमर यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढून तिला नवजीवन दिले. भारतात आतापर्यंत प्रथमच अंडाशयाच्या बाहेर असलेला सर्वात मोठा ट्युमर यशस्वीपणे बाहेर काढण्याची ही शस्त्रक्रिया पार पडली. सरकारी कर्मचारी आणि देवगढबारियाची रहिवासी असलेली ही महिला गेली १८ वर्षे स्वतःच्या शरीरात हा ट्युमर घेऊन जगत होती आणि गेल्या काही महिन्यांपासून अंथरुणाला खिळून राहिलेली होती. आठ डॉक्टरांच्या टीम मध्ये ४ सर्जन्स होते. मुख्य सर्जिकल गॅस्ट्रोएन्टरोलॉजीस्ट डॉ. चिराग देसाई यांनी ट्युमरच्या जोडीलाच या शस्त्रक्रियेदरम्यान साधारण ७ किलोच्या आसपास ओटीपोटाच्या ऊती आणि अतिरिक्त त्वचाही काढून टाकली. शस्त्रक्रियेनंतर या महिलेचे वजन ४९ किलो इतके खाली उतरले. शस्त्रक्रियेआधी ही महिला सरळ उभी राहू शकत नसल्यामुळे तिचे वजन करता येऊ शकले नव्हते.

                  “पोटाच्या पोकळीमध्ये ट्युमरमुळे निर्माण झालेल्या दाबामुळे या महिलेचे यकृत, हृदय, फुफ्फुस, मूत्रपिंड आणि गर्भाशय यांसारखे अंतर्गत अवयव मूळ जागेपासून बाजूला झाले होते. त्यामुळे ही शस्त्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची होती. ट्युमरच्या मोठ्या आकारामुळे सिटी स्कॅन यंत्राच्या साधनालाही अडथळा होत असल्यामुळे सिटी स्कॅन करणेही खूप कठीण बनले होते. पिळवटून गेलेल्या रक्तवाहिन्यांमुळे महिलेचा रक्तदाब अस्थिर होत होता आणि ट्युमर काढल्यानंतर रक्तदाब कमी झाल्यामुळे ती कोसळू नये यासाठी शस्त्रक्रियेच्या आधी तिला विशेष उपचार आणि औषधे देण्यात आली होती. या टीमचा एक भाग असलेले ऑन्को-सर्जन डॉ. नितीन सिंघल म्हणाले, “प्रजननक्षम वयात असताना फायब्रॉईड्स होणे ही अनेक स्त्रियांमध्ये आढळून येणारी गोष्ट आहे पण क्वचितच त्याचा आकार इतका मोठा होतो.” या टीममध्ये भूलतज्ञ डॉ.अंकित चौहान, जनरल सर्जन डॉ.स्वाती उपाध्याय आणि क्रिटिकल केअर स्पेशालीस्ट डॉ. जय कोठारी यांनी महत्वपूर्ण भूमिका पार पाडल्या.विशेष बाब म्हणजे, १८ वर्षांपूर्वी पासूनच या महिलेला हा त्रास सुरु झाला. पोटाच्या भागात अचानकपणे कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नाही असे वजन वाढायला सुरुवात झाली. सुरुवातीला तिने आयुर्वेदिक उपचार करून बघितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. २००४ मध्ये तिने सोनोग्राफी केली आणि त्यात ट्युमर असल्याचे दिसून आले तेव्हा कुटुंबाने शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय निवडला. पण जेव्हा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करायला सुरुवात केली तेव्हा तो ट्युमर अंतर्गत अवयवांना जोडला गेल्याचे दिसून आले. त्यात असलेला धोका बघून डॉक्टरांनी शस्त्रक्रिया थांबवली आणि तो ट्युमर तिच्या शरीरात आहे तसाच राहिला.त्यानंतर या महिलेच्या कुटुंबीयांनी असंख्य डॉक्टरांशी सल्लामसलत केली पण ती सर्व निष्फळ ठरली. दरम्यान, ट्युमरचा आकार वाढतच राहिला आणि गेल्या दोन वर्षांत जवळपास दुपटीने आकार वाढून त्या स्त्रीच्या जीवनमानावर त्याचा गंभीर परिणाम व्हायला लागला. अखेरीस, तिच्या कुटुंबाने अपोलो हॉस्पीटलमध्ये धाव घेतली. त्यांनतर सखोल तपासणीनंतर डॉक्टरांनी २७ जानेवारी रोजी शस्त्रक्रिया करायचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतरची काळजी आणि शुश्रुषा पूर्ण झाल्यानंतर या महिलेला १४ फेब्रुवारी रोजी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

Popular posts
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीतील अतिक्रमणात वाढ , अनधिकृत बांधकाम, बेसमेंट वर कारवाई की वसुली ? , कनिष्ठ अभियंता विनोद आंब्रे व सर्वेयर सिद्देश पुजारी यांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह ?
Image
रोडपाली गावातील अनधिकृत इमारत पूर्णत्वास, सिडको अतिक्रमण अधिकारी नॉट रिचेबल
Image
अंदाज समितीच्या अमृत महोत्सवी वर्षात लोकशाही मूल्यांच्या गौरवाची संधी - लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला , अंदाज समितीच्या ७५ वर्षांनिमित्त मुंबईत राष्ट्रीय परिषद : मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
Image
शिवसृष्टी निर्मितीसाठी शासनाकडून सर्वोतोपरी साहाय्य - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन रायगडावर उत्साहात साजरा
Image
सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामांना गती ?, अतिक्रमण विभागाचे अधिकारी हे सिडकोचे अधिकारी की भूमाफियांचे पार्टनर ?
Image