नवी मुंबई मेट्रो : परिपूर्ण कनेक्टिव्हिटीच्या दिशेने

नवी मुबई :- वेगाने विस्तारणाऱ्या नवी मुंबईतील वाढत्या लोकसंख्येला सार्वजनिक परिवहनाचा नवीन पर्याय म्हणून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प पुढे आला. सदर प्रकल्प विकसित करण्याची जबाबदारी सिडकोवर सोपविण्यात येऊन नवी मुंबईतील नोड (उपनगरे) अंतर्गत तसेच बृहन्मुंबईसोबत उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करणे, हा नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे.   

            “नवी मुंबईला शहरांतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी पुरविण्यासाठी नवी मुंबई मेट्रो प्रकल्प नियोजित आहे. या प्रकल्पातील विकसित करण्यात आलेल्या बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. १ ला प्रवाशांचा पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. या मेट्रो मार्गाद्वारे बेलापूर सीबीडी, तळोजा एमआयडीसी, खारघर व तळोजा येथील सिडकोच्या गृहसंकुलांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. मेट्रो मार्ग क्र. २, ३ व ४ यांची अंमलबजावणी देखील नजीकच्या काळात करण्यात येईल. तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो मार्गाद्वारे जोडण्याची महत्त्वाकांक्षी योजनाही पुढील काळात साकारण्यात येणार आहे.”सिडकोतर्फे एकूण २५ कि.मी. लांबीच्या मेट्रो मार्गाची अंमलबजावणी विविध टप्प्यांमध्ये करण्याचे नियोजित असून यांपैकी पहिल्या टप्प्यातील सीबीडी बेलापूर ते पेंधर (मेट्रो मार्ग क्र. १) मार्गावर नोव्हेंबर २०२३ पासून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. या मार्गाचे परिचालन महा मेट्रोतर्फे करण्यात येत असून सदर उन्नत मेट्रो मार्ग हा शहरातील परिवहन सुविधांमध्ये मोलाची भर घालणारा ठरला आहे.आर्थिक केंद्रे आणि आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, यांमुळे सार्वजनिक वाहतुकीची वाढणारी मागणी लक्षात घेऊन सिडकोने अतिरिक्त मेट्रो मार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मेट्रो मार्ग क्र. १ चा विस्तार : यशस्वी परिचालन आणि भविष्यातील विस्तार (बेलापूर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ)

सद्यस्थितीत मेट्रो मार्ग क्र. १ बेलापूर ते पेंधर हा ११.१ कि.मी. लांबीचा मार्ग असून या मार्गामुळे हजारो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुकर झाला आहे. या मार्गाद्वारे महत्त्वाच्या निवासी आणि वाणिज्यिक क्षेत्रांना उत्तम कनेक्टिव्हिटी लाभली आहे. सिडकोतर्फे ३.०२ कि.मी. मार्गाची भर घालून प्रस्तावित मेट्रो मार्ग क्र. ८ सह या मार्गाचा (मेट्रो मार्ग १ए) सागरसंगम आंतरबदल स्थानक मार्गे बेलापूर ते नमुंआंवि पर्यंत नवी मुंबई महानगरपालिका मुख्यलायासमोर विस्तार करणे नियोजित आहे. या मेट्रो मार्गामुळे प्रवाशांना दोन्ही टर्मिनलमध्ये थेट प्रवेश करणे शक्य होऊन रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व कमी होणार आहे. 

परिचालन नियंत्रण केंद्र

नवी मुंबई मार्ग क्र. १ च्या परिचालन नियंत्रण केंद्राद्वारे नियंत्रण, देखरेख आणि गाड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवले जाते. यामुळे वक्तशीरपणा, सुरक्षितता आणि सेवा चमूबरोबर समन्वय साधणे सुनिश्चित होऊन मेट्रोची कार्यक्षम वाहतूक सुनिश्चित होते. 

मेट्रो ट्रेन ड्रायव्हिंग अनुकारी (सिम्युलेटर)

परिचालन उत्कृष्टता सुनिश्चित करण्याकरिता सिडकोतर्फे मेट्रो ट्रेन परिचालकांना प्रशिक्षण देण्याकरिता मेट्रो ट्रेन ड्रायव्हिंग अनुकारी  सादर करण्यात आली आहे. सदर संगणक आधारित प्रणालीद्वारे प्रत्यक्ष ट्रेन गतिकीचे अनुकरण करण्यात येऊन चालकांच्या प्रशिक्षणाकरिता व नियंत्रण व्यवस्था परियचयाकरिता उच्च वास्तववादी पर्यावरण निर्माण करण्यात येते. 

मेट्रो मार्ग क्र. २ (पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्री विमानतळ टर्मिनल-४)

पेंधर ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (पेंधर मार्गे पूर्व बाजू) दरम्यान कनेक्टिव्हिटी पुरवण्याकरिता मेट्रो मार्ग क्र. २ नियोजित असून याद्वारे वेगाने विकसित होत असलेल्या परिसरांच्या कनेक्टिव्हीटीमध्ये वाढ होणार आहे. या मार्गाची लांबी अंदाजे १५ कि.मी. असून या मार्गाद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतील गृहसंकुलांसह तळोजा औद्योगिक क्षेत्राला थेट कनेक्टिव्हीटी लाभणार आहे. दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदारांसह तळोजा एमआयडीसी येथे उत्पादन क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या कामगार वर्गालाही या मार्गामुळे फायदा होणार आहे. 

या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सिडकोतर्फे सुरू असून नवी मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि उत्पादन संबंधी उपक्रमांमुळे मेट्रोच्या प्रवाशांमध्ये लक्षणीय वाढ होणे अपेक्षित आहे. 

मेट्रो मार्ग क्र. ८ (छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानळ ते नमुंआंवि) दोन विमानतळां दरम्यान कनेक्टिव्हीटी 

समावेश परिवहन अभ्यासाचा (सीटीएस – २०२१) भाग म्हणून सिडकोतर्फे मेट्रो मार्ग क्र. ८ हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प नियोजित असून या मार्गाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कनेक्टिव्हिटी प्रस्थापित होणार आहे. मुंबई महानगर प्रदेशामध्ये या मार्गाची लांबी ३५ कि.मी. असणार आहे. 

मेट्रो मार्ग क्र. ८ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-२ टर्मिनल स्थानकापासून सुरू होऊन मुंबई विमानतळ ते छेडा नगर दरम्यान हा मार्ग भूमिगत असणार असून पुढे नमुंआंवि पर्यंत उन्नत स्वरूपाचा असणार आहे. कुर्ला, एलटीटी, मानखुर्द, वाशी, नेरूळ आणि बेलापूर या महत्त्वाच्या शहरांच्या बाजूने हा मार्ग जाणार आहे. या मेट्रो मार्गाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे :

अंदाजे लांबी ३५ कि.मी.

भूमिगत लांबी ९.२५ कि.मी.

उन्नत लांबी २५.६३ कि.मी.

या प्रस्तावित मार्गामुळे विमानतळांतर्गत कनेक्टिव्हिटी सक्षम होऊन देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांच्या वाढत्या संख्येची परिवहनाची मागणी पूर्ण करणे शक्य होणार आहे. या मार्गाद्वारे व्यग्र वेळापत्रक किंवा कनेक्टिंग विमाने असताना, दोन विमानतळांदरम्यान सुलभ हस्तांतरण वाढीस लागणार आहे. विमानतळाभोवतालच्या रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण हलका करण्यासह विमानतळाकडे ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवासाच्या वेळेमध्ये बचत करणे हा देखील या प्रकल्पाचा उद्देश आहे. 

नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाचे प्रमुख फायदे

वाहतुकीचा ताण कमी : शहरांतर्गत रस्त्यांवरील वाहनांची वाढती रहदारी लक्षात घेता मेट्रो मार्गाद्वारे उच्च क्षमतेचा परिवहनाचा पर्याय उपलब्ध होऊन रहदारी कमी होऊन प्रवासाच्या वेळेतही सुधारणा होणार आहे

पर्यावरणीय शाश्वतता : विद्युत शक्तीवर धावणाऱ्या उन्नत मेट्रोमुळे नागरी परिवहनातील कार्बन उत्सर्जन कमी होऊन शहराच्या पर्यावरणविषयक उद्दिष्टांकरिता योगदान मिळणार आहे

आर्थिक विकास : मेट्रो स्थानकांलगतच्या परिसराच्या विकासाला चालना मिळून बांधकाम मूल्य वाढीस लागून रोजगार आणि वाणिज्यिक गुंतवणूकीला प्रोत्साहन मिळणार आहे

विमानतळाकरिता वाढीव सुगमता : नमुंआंविकरिता उत्तम मेट्रो कनेक्टिव्हीटीद्वारे सदर विमानतळ हे उच्च दर्जाच्या बहुउद्देशीय कनेक्टिव्हिटीसह जगातील स्पर्धात्मक विमानतळ म्हणून उदयास येणार आहे

परिवहनाच्या अन्य साधनांसोबत एकात्मिकरण : सदर नियोजित मेट्रो मार्गाद्वारे उपनगरीय रेल्वे, बस आणि भविष्यातील परिवहन प्रणालींसोबत सुलभरीत्या एकात्मिकरण अपेक्षित असून प्रवास अधिक कार्यक्षम होणार आहे.

बहुउद्देशीय व सर्वसमावेशक पायाभूत सुविधा

नवी मुंबई मेट्रोसोबत विविध प्रवासीस्नेही सुविधांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे : 

बहुउद्देशीय कनेक्टिव्हीटी : शहर बस सेवा आणि भविष्यातील परिवहन प्रणालींसोबत उत्कृष्ट एकत्रिकरण

सुगम्यता : सुलभ वापराकरिता सर्व स्थानकांवर उद्ववाहन आणि सरकते जिने

सार्वजनिक सुविधा : स्वच्छ आणि उत्तम देखभाल असणारे विश्रांती कक्ष, वाहनतळ आणि प्रवासी सहाय्य

ध्वनि व्यवस्थापन : शहरामधील शांतता अबाधित राखण्यासाठी स्थानकांलगत विशेष ध्वनि नियंत्रण प्रणाली 

नागरी परिवर्तनाकरिता प्रेरक

दक्षिण नवी मुंबईतील ५००,००० लोकसंख्येला मेट्रोच्या जाळ्याचा फायदा मिळणे अपेक्षित असून प्रवासामध्ये सुधारणा होण्यासह नगर विकासाला चालना मिळणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो व वाणिज्यिक केंद्र यांसारख्या पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबई अग्रगण्य प्रादेशिक केंद्र म्हणून उदयास येणार आहे. 

मेट्रो प्रकल्पाकरिता सिडकोचे नियोजन आणि गुंतवणूकीमुळे नवी मुंबईतील सद्यस्थितीतील परिवहन समस्यांवर मात करणे शक्य होण्याबरोबरच आधुनिक, शाश्वत आणि उत्तम कनेक्टिव्हिटी असलेल्या भविष्याचा पायाभरणी करण्यात आली आहे. 

धोरणात्मक नियोजनाचा दृष्टीकोन

नवी मुंबईकरिता दीर्घकालीन परिवहनाच्या गरजा ओळखून, सिडकोतर्फे परिवहनाच्या सुयोग्य उपाययोजना शोधण्याकरिता सखोल व्यवहार्यता अभ्यास हाती घेण्यात आला. यातून मेट्रो रेल्वे हा सर्वाधिक कार्यक्षम आणि शाश्वत पर्याय म्हणून पुढे आला. महाराष्ट्र शासनातर्फे बेलापूर-पेंधर-कळंबोली-खांदेश्वर मार्गाची प्राधान्याने अंमलबजावणी करून शहराच्या वाढीला परिवहन पायाभूत सुविधांची जोड देण्याकरिता सिडकोची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात आली.   

भविष्यातील वाटचाल

नवी मुंबई मेट्रो हा केवळ परिवहन प्रकल्प नसून नवी मुंबईचे स्मार्ट, उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या आणि भविष्याकरिता सज्ज असलेल्या शहरामध्ये रूपांतर करण्याकरिता महत्त्वाचा घटक आहे. नवी मुंबई मेट्रोचा प्रत्येक टप्पा साकारण्यात आल्यानंतर प्रवासाच्या वेळेमध्ये बचत, प्रदूषण कमी करणे यांसह शाश्वत विकासाला प्रोत्साहन आणि नवी मुंबईच्या आर्थिक क्षमता पूर्णपणे वापरात आणणे, ही उद्दिष्टे साध्य होणार आहेत.

Popular posts
राज्यातील २० आय.टी.आय मध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारणार, शल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभागाचे तीन सामंजस्य करार, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा बळकटीकरणासाठी वैद्यकीय व्यावसायिकांचा सहभाग महत्वाचा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image
महापालिका, सिडको आणि एमआयडीसीकडून अनधिकृत बांधकामांचे सर्वेक्षण , तरी गावठाण भागात अनधिकृत बांधकामे जोमात, करावे गाव आघाडीवर ?
Image
तुर्भेतील अनधिकृत बांधकामे,झोपडपट्टी,हॉटेल्स व गॅरेज विरोधात धरणे आंदोलन, विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांच्याकडून कारवाई न झाल्याने धरणे आंदोलन, तुर्भे विभाग कार्यालयात कारवाई कमी वसुली जास्त,वसुली साठी मवाडे यांच्याकडून दोघांची नियुक्ती ?
Image
तुर्भे विभाग कार्यालय हद्दीत भ्रष्टाचार करणाऱ्या सह्हायक आयुक्त तथा विभाग अधिकारी प्रबोधन मवाडे यांची अखेर उचलबांगडी. लोकमान्य मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनंतर मवाडे यांची बदली,सागर मोरे यांच्याकडे तुर्भे विभागाचा पदभार , मवाडे यांची बदली,मात्र त्यांचे वसुलीबाज अजूनही विभाग कार्यालय हद्दीतच, पवार व शेलार यांच्यावर कारवाई कधी ?
Image